सिंधुदुर्ग – अतिवृष्टीत करूळ घाटाचे झालेले नुकसान हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे झाले आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर करत त्यांना धारेवर धरले. तुम्ही साहेबा सारखे वागू नका. कृतीतून काम करून दाखवा. खचलेल्या भागाची डागडुजी करण्याचे काम तात्काळ हाती घ्या. घाटातील गटारे साफ न केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे असेही नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.
सोमवारी पहाटे मुसळधार पावसात करूळ घाट रस्ता खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.
या मार्गाची पाहणी आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. गटारातील गाळ, दगड काढले असते, तर घाट खचला असता का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
खचलेला भाग दुरुस्तीसाठी 13 दिवस कशासाठी? एवढी वेळ का? जनतेला त्रास देण्याचे ठरवले आहे का? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.
लवकरात लवकर खचलेला भाग बांधून घ्या. आणि मार्ग पूर्ववत करा. यात कोणतीही सबब चालणार नाही. अशी तंबी अधिकाऱ्यांना त्यांनी दिली.
भुईबावडा घाट मार्ग हा पर्यायी मार्ग होऊ शकत नाही. त्या घाटाची अवस्था कधी बघितलाय का? 26 जुलै पर्यंत करुळ घाट बंद राहिला तर भुईबावडा घाटात रहदारी वाढू शकते. आणि तो घाट कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रमुख कार्यालयातील अधिकारी श्री. शेलार यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी संपर्क साधत घाटाची परिस्थिती कथन केली.
आपल्या विभागाच्या दुर्लक्षामुळे घाट खचला आहे. या कामाकडे प्रामुख्याने लक्ष द्या. त्वरित या मार्गावरील वाहतूक चालू झाली पाहिजे असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
काम त्वरित चालू करून पूर्ण होईपर्यंत मी स्वतः अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.