महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा घेऊन रिंगणात उतरलेल्या राणांची ही कोलांटउडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्या देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण जिंकल्यानंतर लगेच नवनीत राणा आणि रवि राणा यांनी भाजपच्या सत्तावर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांची छायाचित्रे प्रसिद्धीला पाठवली होती. त्यावेळी नवनीत राणा या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रवि राणांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. रवि राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
आमदार रवि राणांची कोलांटउडी, भाजपाला दिला बिनशर्त पाठिंबा
