सीआरझेड’च्या सूचना मराठीत प्रसिद्ध कराव्यात अशी राज्य सरकारकडे मागणी करणार – दीपक केसरकर

0
126

 

केरळ, गुजरात राज्य सरकारने ज्याप्रमाणे प्रादेशिक भाषेत ‘सीआरझेड’च्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने ‘सीआरझेड’च्या नवीन 2019 अध्यादेशातील सूचना नकाशासह मराठी भाषेत प्रसिद्ध कराव्यात. त्यामुळे नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी अडचणी येणार नाहीत. याबाबत शासनाचे लक्ष वेधणार, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी येथे दिली.

‘सीआरझेड’ नवीन सूचनांबाबत 13 मार्चला जिल्हा प्रशासनाने सुनावणी लावली आहे. या सुनावणीसाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार आहे. ‘सीआरझेड’ जनजागृतीसाठी येत्या आठ दिवसात तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले. या नवीन सूचनांनुसार नकाशा व त्यातील सर्व्हे नंबर लक्षात घेऊन ग्रामपंचायत तसेच वैयक्तिक हरकती ऑनलाईन नोंदवा, असे आवाहनही त्यांनी केले.

वेंगुर्ल्यात सर्वपक्षीय, सामाजिक कार्यकर्ते व सुजाण नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, प्रतिनिधी, शासकीय अधिकाऱयांची सीआरझेडच्या नवीन नोटिफिकेशनबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. आमदार केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रादेशिक फळसंशोधन केंद्राच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ले सभापती अनुश्री कांबळी, ‘सीआरझेड’ संघर्ष समितीचे समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, केंद्रीय समिती माजी सदस्य बाबा नाईक, जिल्हा समिती सदस्य वसंत तांडेल, जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे सचिव दीनानाथ वेर्णेकर, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी सभापती सुनील मोरजकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, शहरअध्यक्ष सत्यवान साटेलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, विवेक आरोलकर, नगरसेवक तुषार सापळे, सुरेश भोसले, आनंद हुले, बंडय़ा सावंत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, मठ सरपंच तुळशीदास ठाकुर, मोचेमाड सरपंच अन्विषा पालव, वायंगणी सरपंच सुमन कामत, केळूस उपसरपंच आबा खवणेकर, दत्तगुरू परब, मालवणचे दिलीप घारे यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते. या बैठकीत आमदार केसरकर यांनी सीआरझेड संदर्भात सन 2019चे नवीन नोटिफिकेशन निघाले आहे. त्यामध्ये आपल्या पर्यटन जिल्हय़ाला खूप चांगल्या सवलती दिल्या आहेत. त्याच फायदा आपल्या पर्यटन जिल्हय़ाला व व्यावसायिकांना होणार आहेत. तसेच स्थानिक मच्छीमारांनाही त्याचा फायदा होणार आहे, असे सांगितले.

हरकती नोंदवाव्यात!

केसरकर म्हणाले, सन 2019 च्या सीआरझेड नवीन नोटिफिकेशची प्रसिद्धी या जिल्हय़ात अद्याप हवी तशी झालेली नाही. ती ग्रामपंचायतनिहाय होण्यासाठी आपण पर्यटन विभागाचे सचिव व एमटीडीसीचे एम. डी. यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्या नोटिफिकेशचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायतीत मराठीत प्रसिद्ध करा, अशी सूचना केली आहे. लवकरच ते उपलब्ध होईल. नोटिफिकेशन प्लॅन व सर्व्हे नंबर पाहून प्रत्येक ग्रामपंचायतीने तसेच वैयक्तिक नागरिकांनी ऑनलाईन आपल्या हरकती नोंदवाव्यात.

जिल्हय़ात वेंगुर्ले, मालवण, देवगड, कुडाळ, सावंतवाडी या पाच तालुक्यातील 107 गावांमधील क्षेत्र ‘सीआरझेड’ बाधित आहे. त्यातील 20 ते 25 गावात समुद्र वा खाडी नसताना त्या गावांचा समावेश केला गेला आहे. हे नोटिफिकेशनच्या नकाशावरून पाहून त्याबाबत आक्षेप (हरकती) नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सदर भाग खुला होणार आहे. याची जनजागृती होण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना एकत्र आणून 2019 च्या सुधारित नियमावली व प्रारुप नकाशाबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या नोटिफिकेशनमधील टी-5 मध्ये किनाऱयावरील पर्यटन विकासासाठी महत्वपूर्ण अशा गोष्टींची तरतूद आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

सामाजिक कार्यकर्ते आनंद हुले म्हणाले, सागरी अभयारण्याची हद्द नकाशात स्पष्ट दिसत नाही. कुठे मासेमारी करावी व करू नये, निवती रॉक हा महाराष्ट्र शासनाचा आहे, त्याचा नकाशात उल्लेख नाही.

सहा मार्चला ग्रामसभा

जिल्हय़ातील ‘सीआरझेड’बाधित 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीत सहा मार्चला एकाच दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून सदर प्रारुप आराखडा फेटाळण्यासंदर्भात व जनसुनावणी रद्द करण्याची मागणीसंदर्भात ठराव घेण्यात येणार अशी, माहिती कोस्टल बेल्ट डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here