कोमसाप माजी अध्यक्ष केळुसकर यांची हकालपट्टी

0
156

 

सदस्यांच्या बनावट सहय़ा करून कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) संस्था बरखास्त करण्याची मागणी करणाऱया ‘कोमसाप’चे माजी अध्यक्ष महेश केळुसकर यांची कोमसापमधून हकालपट्टी केल्याची घोषणा अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. तर केळुसकर यांनी कोमसापच्या कारभाराबाबत केलेले सर्व आरोप पूर्णतः खोटे आहेत, असेही प्रा. ठाकूर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद ही नवोदित कवी, साहित्यिक यांना सोबत घेऊन जाणारी संस्था आहे. महेश केळुसकर यांच्यावर संस्थेचे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी विश्वास टाकला होता. त्यामुळेच ते संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष होऊ शकले. ज्यांनी महेश केळुसकर यांना मोठे केले, त्या मधुभाईंवरच कृतघ्न, कपट कारस्थान केळुसकर यांनी केल्याचा आरोप प्रा. ठाकूर यांनी केला आहे. केळुसकर यांनी वृत्तपत्रासह सोशल मिडियातून कोमसापची बदनामी सुरू केली तर स्वहस्ताक्षरात मजकूर लिहून सदस्य गजानन खंडोरी, विलास सरमळकर यांच्याकडे पाठवला होता. त्यामध्ये विश्वस्त मंडळ कायद्याचे उल्लंघन करून गैरकारभार करत असल्याने संस्थेची मान्यताच रद्द करा, असा मजकूर लिहून दिला. परंतु दोघांनीही त्यावर स्वाक्षरी न केल्याने महेश केळुसकर यांनी खोटय़ा सह्या करून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. परंतु खंडोरी, सरमळकर यांनी धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या पत्रामुळे ही गोष्ट उघड झाल्याचे प्रा. ठाकूर यांनी देलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

एका पदाधिकाऱयाच्या मृत्यूमुळे संस्थेचा चेंज रिपोर्ट देण्यात आला नव्हता. त्यामुळे पुढील वर्षाचे चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांनी स्वीकारले नाहीत. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. 2019 पर्यंतचे वार्षिक हिशोब तपासण्यात आले आहेत. स्मारक समिती व्यवस्थापनाची मान्यता घेऊन केशवसुत स्मारकातील काम योग्य पद्धतीने सुरू आहे. घटनेतील तरतुदीनुसार, कार्यकारिणी, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने रमेश कीर यांची नियुक्ती करण्यात आली तर नमिता कीर यांचीही नियुक्ती मुदतवाढ नियमानुसारच करण्यात आल्याने या बाबत केलेले आरोप खोटे आहेत. कुसुमाग्रज, श्री. पु. भागवत व मधुभाई यांच्या उल्लेखाने स्मारकाची कोनशिला उभारण्यात आली. या बाबत झालेले आरोप खोटे आहेत. आतील काव्यदालन, काव्यशिल्पे कर्णिक यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले तर रमेश कीर यांच्या संकल्पनेतून कोकण साहित्य संमेलन दालन उभे राहत आहे. केशवसुत स्मारक हे पूर्णपणे मधुभाईंच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून मधुभाईंनी सुमारे 2 कोटी रुपये एकहाती गोळा करून याची उभारणी केली. यात महेश केळुसकर यांनी दिडकीही दिलेली नसल्याचे प्रा. ठाकूर यांनी म्हटले आहे.

कोमसापच्यावतीने देण्यात येणारा कविता राजधानी पुरस्कार महेश केळुसकर यांनी पैसे वाढवून स्वतःसाठी घेतला. याला रमेश कीर यांनी आक्षेप घेतल्यामुळे केळुसकर त्यांच्यावर टीका करत आहेत. 19 फेब्रुवारी रोजीच्या कार्यकारिणी बैठकीत केळुसकर यांचे कपट कारस्थान लक्षात घेऊन त्यांची कोमसापमधून हकालपट्टी करण्यात आली आहे तर केळुसकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रा. ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here