सिंधुदुर्ग – कणकवली शहरात भर दिवसा श्रीधर नाईक चौकात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रचार प्रमुखावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप सतीश सावंत, आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
अज्ञातांनी केला हल्ला
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले आहेत. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकल ला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत; सतीश सावंत यांचा आरोप
जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला. जिल्हा बँक निवडणुक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव असल्याचंही सावंत म्हणाले. 2015 साली राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेलींवर अशाच प्रकारे सावंतवाडी रेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जनता राणेंच्या या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले.
खुनी हल्ल्याचे सूत्रधार असलेल्या राणेंना चोख प्रत्युत्तर देणार – आमदार वैभव नाईक
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले असून जिल्हा बँकेत पराभावाच्या भीतीने नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करून जिल्हा बँक सारख्या सहकार निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत आहेत. मात्र या दहशतीला शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला.
कणकवलीत पोलीस बंदोबस्तात वाढ
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने शिवसेनेत प्रचंड चीड निर्माण झाली असून शिवसैनिक हल्लेखोरांच्या इनोव्हा गाडीच्या शोधात निघाले आहेत. दरम्यान पोलीस यंत्रणेने या हल्ल्याची त्वरित दखल घेतली असून डीवायएसपी डॉ नितीन कटेकर, एलसीबी पोलीस निरीक्षक धनावडे, कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर कणकवली शहरात आणि जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.