26 C
Panjim
Friday, January 28, 2022

सिंधुदुर्गला दिलासा, 19 रिपोर्ट निगेटिव्ह  यंत्रणा अलर्ट, घरोघरी सर्व्हे : विलिगीकरण कक्षात 11 रुग्णांवर उपचार सुरू

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये गुरुवारी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर सर्वत्र एकत्र खळबळ उडाली. कोरोना बाधित रुग्ण ज्या ट्रेनमधून आला, त्या ट्रेनमधून प्रवास केलेल्या अन्य प्रवाशांचा शोध घेऊन तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्या रुग्णाच्या गावात घरोघरी जाऊन आरोग्य यंत्रणेने सर्व्हे सुरू केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट केली असून सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षात 11 रुग्णांवर उपचार सुरू असून 10 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एकूण 20 नमुन्यांपैकी एक पॉझिटिव्ह वगळता उर्वरित 19 नमुन्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी मेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा कर्नाटक येथील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्याच टेनमधून त्याच बोगीतून कणकवलीत उतरलेल्या सात प्रवाशांपैकी एक रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे व त्याचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारीच जाहीर केले.

मुंबई सीएसटीवरून सुटलेल्या मेंगलोर एक्स्प्रेसमधील एका बोगीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्या बोगीमधून रत्नागिरीत पंधरा व कणकवली सात प्रवासी उतरले होते. 19 मार्चपासूनच कणकवलीत उतरलेल्या दोघांचे जिल्हा प्रशासनाने ‘होम क्वारंटाईन’ केले होते. कणकवली स्टेशनला उतरलेल्या या प्रवाशांपैकी तीन प्रवासी पुन्हा मुंबईकडे माघारी परतले आहेत. तर यातील एक प्रवासी आपल्या घरी होता. आरोग्य विभागाने शोधमोहीम राबवित या प्रवाशाची आई तसेच त्यालाही होम क्वारंटाईन केले होते. त्याच्या आईला खोकला असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे आणि मुंबईहून आलेल्या मुलाचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला. या रिपोर्टनुसार मुंबईहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. या रुग्णावर आता जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र त्याला अद्यापही आजाराची कोणतीच लक्षणे नसल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. तसेच आईचा रिपोर्ट मात्र कोरोना निगेटिव्ह आला आहे. तिला खोकल्याचा त्रास जाणवत असून तिच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असंही डॉ. चाकुरकर यांनी यावेळी सांगितले.

घाबरू नका, काळजी घ्या!

दरम्यान जिल्हय़ातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. घरातून बाहेर पडू नये. तसेच एकमेकांशी संपर्क टाळावा व आपली काळजी घ्यावी. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांनी त्याच काळासाठी दक्षता घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. जिल्हय़ात सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असून परजिल्हय़ातून येणाऱया जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना अडविले जात नसून त्यांना यापुढे पास देण्याचीही व्यवस्था करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

3401 व्यक्तींची तपासणी

कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तसेच कोणाकोणाला व कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली, याची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्याच्या घरापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये प्रत्येक घरी जाऊन वैद्यकीय सहाय्यक, आशा व आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.  जिल्हय़ात आजपर्यंत एकूण 3401 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिल्हय़ातील सर्व पोलीस तपासणी नाक्मयांवर 405 व्यक्तींचा तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे आढळलेली नाहीत.

विलगीकरण कक्षात 11 रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा रुग्णालयाच्या विलिगीकरण कक्षामध्ये एकूण 21 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 20 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 19 रुग्णांचे निगेटीव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सद्यस्थितीत विलिगीकरण कक्षामध्ये 11 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर 10 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -