मालवनमध्ये उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्यात भर सभेत खडाजंगी

0
59

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील ग्रामसडक योजनेतील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करा. या आशयाचा ठराव घेण्यावरून मालवण पंचायत समिती सभेत उपसभापती राजू परुळेकर व गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

भर सभेत व्यासपीठावर सुरू असलेल्या या वादामुळे सभागृह आवाक झाले. दरम्यान सभापती अजिंक्य पाताडे यांनी मध्यस्थी करत वाद शांत केला व ठरावही घेण्यात आला.

चिंदर-आचरा परिसरातील ग्रामसडक योजनेतील रस्त्यावर काही वर्षातच खड्डे पडले आहेत. मात्र त्याची कोणत्याही प्रकारे डागडुजी होत नाही. याप्रश्नी सदस्य अशोक बागवे व निधी मुणगेकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची मुदत असताना त्या मुदतीत खड्डे बुजवत नसलेल्या व रस्त्यांची योग्य पद्धतीने देखभाल न ठेवणाऱ्या ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करा.

या आशयाचा ठराव उपसभापती राजू परुळेकर यांनी मांडला. मात्र असा ठराव घेण्यास गटविकास अधिकारी यांनी उपसभापती राजू परुळेकर यांना विरोध दर्शवला. असा ठराव नको, आपल्या अधिकारात हा ठराव नाही. अशी भूमिका गटविकास अधिकारी यांनी मांडली.

मात्र उपसभापती राजू परुळेकर आक्रमक बनले. सदस्य वारंवार प्रश्न मांडतात मात्र त्याची दखल घेतली जात नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. ठराव घ्यावाच लागेल. ठेकेदाची जबाबदारी त्याने पूर्ण करावी अन्यथा योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.

यासाठी ठराव आवश्यक असल्याचे उपसभापती परुळेकर यांनी सांगितले. अखेर रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती मुदतीत खड्डे न बुजवणे व अन्य देखभाल काम न करणाऱ्या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असा ठराव घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here