सोनवडे घाटमार्गासाठी सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठानला चार कोटींचा निधी वर्ग कोरोनामुळे टेंडर प्रक्रिया लांबण्याची शक्यता

0
136

 

सिंधुदुर्ग – सोनवडे घाटमार्गासाठी सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठानला सुमारे 4 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण कोल्हापूरने वर्ग केला आहे. तसेच नागपूर वन्यजीव विभागाने सुचवलेल्या वन्यजीव सुरक्षेच्या उपाययोजनांचा कंप्‍लाईन्स रिपोर्टही सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूर वन्यजीव विभागाकडे पाठवला आहे. वन्यजीव विभागाच्या मान्यतेनंतर आता कोल्हापूर वनविभागाकडून या घाटमार्गाला केवळ अंतिम मंजुरी बाकी आहे. त्यानंतर टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच नवीन कामांना राज्य शासनाने स्थगिती दिल्याने या घाटमार्गाची टेंडर प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

सोनवडे घाटमार्गाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे आता दूर होऊ लागले आहेत. या घाटमार्गाच्या मंजुरीसाठी अनेक दिव्ये पार करावी लागली आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठानला घाटमार्ग कामाच्या 2 टक्के म्हणजेच 4 कोटी 20 लाखाचा निधी वर्ग करावयाचा होता. यातील 67 लाख रूपये तीन महिन्यांपूर्वीच प्राप्त झाले होते. मात्र, उर्वरित साडेतीन कोटीच्या निधीची प्रतीक्षा होती. मात्र तेही सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग कोल्हापूर यांच्याकडे प्राप्त झाले असून हा निधी व्याघ्र प्रतिष्ठानकडे वर्ग करण्यात आला आहे. आता वन्यजीव विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करण्याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूर वन्यजीव विभागाकडे पाठविला आहे. या विभागाच्या शिफारशीनंतर कोल्हापूर वनविभागाकडून या घाटमार्गाच्या कामाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. सुमारे 40 वर्षांच्या अथक लढ्यानंतर सोनवडे घाटमार्ग आता दृष्टिपथात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here