सिंधुदुर्ग – 2022 साली माझा वाढदिवस साजरा होईल त्या दरम्यान वर्षभरात सिंधुदुर्गात नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पं. स. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवण्याचा आपण संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीत येथील वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली चांदा ते बांदा ही योजना रत्न-सिंधु या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेला भरीव निधीची मागणी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. विनायक राऊत, आम. वैभव नाईक, आम. दीपक केसरकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 -30 वर्षे रखडलेली विकासकामे मागील 2 वर्षांत मार्गी लागली. शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ, आडाळी एमआयडीसी सारखे प्रश्न मार्गी लागले. जिल्ह्यातील अनेक रस्ते तयार झाले. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावरच येत्या वर्षभरात होत असलेल्या सर्व निवडणूका जिंकण्यासाठी कंबर कसूया, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.