मिरची लागवडीतून त्यांनी शोधले रोजगाराचे नवे दालन

0
166

 

शेती व्यवसायाला मेहनत आणि योग्य नियोजनाची जोड दिल्यास चांगल्या पैकी आर्थिक लाभ मिळू शकतो हे निवे बुद्रुक तेलीवाडीमधील प्रयोगशील शेतकरी सुरेश शंकर महाडीक यानी मिरची लागवडीतून सिध्द करून दाखवले आहे. घराशेजारी असलेल्या केवळ दहा गुंठे जागेतून आता पर्यंत तब्बल साडे चारशे किलो इतके मिरचीचे उत्पादन घेतले असून त्यापासुन त्याना तीन महिन्यात सुमारे ४५ हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला आहे.

प्रामुख्याने कोकणात भरली मिरची किंवा सांडगी मिरचीला जेवणात मानाचे स्थान आहे. कोकणात आकाराने लहान आणि जाडसर हिरवी मिरचीची लागवड घराच्या परसबागेत हमखास केली जाते. त्यापासून लोणचं आणि मसाला घालून केलेली भरली मिरची करतात . जेवणात तिखटपणाचा ठसका निर्माण करणारा हाच घटक आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत होवू शकतो हे संगमेश्वर तालुक्यातील निवे येथील रहिवासी आणि प्रगतशील शेतकरी सुरेश महाडीक यांनी हेरले .आपल्या शेत जमीनमध्ये यापूर्वी त्यानी सुर्यफूलाचे: झेंडूची फुले आणि काकडी चे उत्पादन घेतले आहे. तसेच घरगुती वापरासाठी मिरची लागवड करीत होते. केवळ भाजावळ आणि शेनखत वापर केल्यामुळे महाडीक यांच्या मिरचीला बाजारात मोठी मागणी आहे. मिरचीचे बियाणां साठी त्यानी घरामध्येच लागवड केलेल्या गावठी मिरचीच्या रोपांपासून उत्तम प्रतीच बियाण घरीच निर्माण केले आहे.

नोव्हेंबर महिन्यात घरा लगत असलेल्या शेत जमीनीची त्यानी चांगल्या प्रकारे मशागत केली. तसेच शेणखत घालून वाफे तयार केले आणि मिरचीची लागवड केली. स्वत:चा बोअरवेल आणि इलेक्ट्रीशियनचा व्यवसाय संभाळून घरातील महिला वर्गाच्या साहाय्याने त्यानी शेती व्यवसाय सुध्दा तितक्याच आवडीने जोपासला आहे. यामध्ये त्यांची वृद्ध आई पार्वती पत्नी स्मिता आणि भावजय सायली संतोष महाडीक यांचे मोलाचे सहाकार्य लाभते. नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेल्या मिरचीपासून तीन महिन्यात त्यानी साडेचारशे किलो इतकी हिरवी मिरची मिळाली आहे. स्थानिक बाजार पेठेत प्रती किलो शंभर रुपये या दराने ते व्यापार्याना विक्री करतात. आता पर्यंत त्यानी ४५ हजाराची मिरची विकली आहे. घरातील महिलांच्या सहकार्याने त्यानी ही किमया साध्य केली आहे. योग्य नियोजन;मेहनत घेतल्यास शेती सुध्दा किपायत ठरू शकते हेच सुरेश महाडीक यानी आपल्या प्रयोगातुन दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here