कोरोनामुळे कोकणातील व्यवसाय संक्रमित, मटण 650 रुपयांवर, माशाची निर्यात घटली, पर्यटन व्यवसायावरही परिणाम

0
127

 

कोरोनाच्या प्रभाव कोकणात फारसा नसला तरी येथील उद्योग मात्र चांगलाच अडचणीत आला आहे. चिकन बाबतच्या अफवांमुळे कालपरवा 400 रुपये किलोवर असलेला बकरा मटणाचा भाव 650 रुपये किलोवर पोचला आहे तर चिकन कोंबडी 40 रुपये किलो भावाने मिळत आहे. मत्स्य निर्यातीत 30 ते 40 टक्यांने घट झाली आहे. कोकणातील पर्यटन हंगामही चांगलाच अडचणीत आला आहे.

कोकणातील मत्स्य व्यवसाय हा येथील अर्थकारनातला महत्वाचा घटक आहे. मुंबई वगळता नुसत्या कोकणातून 15 ते 16 हजार टन मासे निर्यात होत असतात. मात्र, कोरोनो व्हायरसमुळे ही निर्यात 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे रत्नागिरीतल्या गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जुन गद्रे यांनी सांगितले.

महाराष्‍ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथील किनारपट्टी ही प्रामुख्याने कोकण प्रदेशाने व्यापलेली आहे. मोठ्या प्रमाणात मासे कोकणातून बाहेरच्या देशांत निर्यात होत असतात. बांगडा, म्हाकूल, कोळंबी व अन्य काही फ्रोजन माशांची मोठ्या निर्यात होते. माशांपासून तयार केलेले इतर पदार्थ ज्यामध्ये रेडी टू इट पदार्थही मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. मात्र, माशांपासून तयार केलेल्या पदार्थांच्या निर्यातीबाबत वर्षाच्या सुरुवातीला ज्या बैठका होतात, त्या बैठका या कोरोना व्हायरसमुळे रद्द झाल्या आहेत. त्याचा परिणाम येत्या दोन महिन्यात दिसून येईल असे गद्रे यांनी सांगितले.

जे देश फ्रोजन मासे भारतातून आयात करतात, ही फ्रोजन माशांची आयात 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. विशेष म्हणजे एकट्या चीनमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त निर्यात या फ्रोजन माशांची भारतातून होत असते. मात्र, कोरोना विषाणूचे मुळ केंद्रच चीन असल्यामुळे फ्रोजन माशांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मासे निर्यातदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार एवढे नक्की.

रायगडमध्ये परदेशी पर्यटकांना मज्जाव

कोरोनाच्या भीतीमुळे रायगडच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. सध्या लागोपाठ होळीची सुट्टी असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे बेत आखले. मात्र, कोरोनाच्या धसक्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना हे सर्व बेत रद्द करावे लागले आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंगमध्ये केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका जिल्ह्यातील हजारो हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्र किनाऱ्यावरील व्यवसायिकांना बसला आहे. परदेशी नागरिकांना जिल्ह्यात नो एन्ट्री असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे परदेशी पर्यटक रेडिसन ब्ल्यू, फाऊंटन, ट्रॉपिकाना या बड्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत असतात. त्याचप्रमाणे काशिद येथील प्रकृती रिसॉर्ट, अलिबागच्या फर्न रिसॉर्टला परदेशी पर्यटकांचा ओघ असतो. मात्र, जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून परदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला आहे. बोटीने येणाऱ्या पर्यटकांच्या तपासणीसाठी मांडवा जेट्टी येथे देखील विशेष पथक आरोग्य विभागाकडून नेमले जाणार आहे.

सिंधुदुर्ग मालवनमध्ये दुबईतून आलेल्या युवकाची तपासणी

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. मालवण तालुक्यातील एका गावात दुबईतून आलेल्या युवकाची आरोग्य तपासणी मालवण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या युवकाची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याच्या रक्ताचे नमुने नॉर्मल आले आहेत. तरीही खबरदारी म्हणून स्थानिक आरोग्य विभागाला त्या युवकाच्या प्रकृतीवर आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

मालवण तालुक्यातील अनेक युवक सध्या दुबईमध्ये नोकरीनिमित्त कार्यरत आहेत. काही तरुण दुबईतून आपल्या गावी आले आहेत. अशा तरुणांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यादृष्टीने तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात एक युवक दुबईतून आपल्या गावी आल्याची माहिती मिळताच त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. आता पुढील 14 दिवस तो आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. त्या युवकाची प्रकृती ठिक असून तो आपल्या घरीच राहणार आहे, असेही वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here