महीलेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकल्या प्रकरणातील दोघा संशयितांना ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

0
139

सिंधुदुर्ग – महीलेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकल्या प्रकरणातील दोघा संशयितांना येथील न्यायालयाने दि.५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी खून करून मृतदेह आंबोली नेण्यासाठी गाडी वापरली,त्या मालकाची माहिती पोलीस घेत आहेत आणि या प्रकरणी आणखी कोण कोण आहेत त्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे.

पोलिस निरीक्षक शशिकांत खोत म्हणाले, या महीलेचे चप्पल, मोबाईल, पर्स आदीचा शोध घेतला जात आहे.ते संशयितानी दाखविल्या नंतर घटनास्थळ आणि महीलेची ओळख पटण्यास सुराग मिळेल.या महीलेला ठार मारण्याचा हेतू आणि या खून प्रकरणी आणखी कोण आहेत का? ते तपासले जात आहे.या शिवाय महीलेला कुणी नेले, ठार मारले त्या कटात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आणि वाहने वापरली त्याची चौकशी सुरू आहे.दरम्यान अल्पवयीन दोघा साथीदारांना बाल न्यायालयात नेले जाणार आहे.आज प्रमुख दोघांही संशयितांना येथील न्यायालयात हजर केले असता तपासासाठी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

आंबोली घाटात मृतदेह मिळाला ती महिला मळगाव मधून बेपत्ता झालेली गितांजली गुणाजी मळगांवकर ( ५२, रा. मळगाव देवूळवाडी )असल्याची माहीती पोलीस तपासात उघड झाली आहे. मात्र, डीएनए चाचणी अहवालानंतरच खरी ओळख पटणार आहे. सदरची महिला महिनाभरापूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार सावंतवाडी पोलिसात देण्यात आली होती, असे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी सांगितले.

मळगाव मधील ही महिला ३१ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहरातून बेपत्ता होती. त्यानंतर या संबधीची खबर तिचा मुलगा प्रथमेश मळगावकर याने १ सप्टेंबर रोजी सावंतवाडी पोलिसात दिली होती. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आंबोली घाटात एका महिलेचा मृतदेह सापडला होता.तो सडला होता त्यामुळे ओळखले नाही.
मळगाव देऊळवाडी येथे आपल्या पती व मुलासह राहणारी महीला बेपत्ता झाली होती सावंतवाडी शहरात घर कामाच्या निमित्ताने ती रोज येत असे. त्यानंतर रोज रात्री एका ठरलेल्या रिक्षाने ती गावी जात असे. मात्र, ज्या दिवशी ती हरवली त्यादिवशी ती त्या रिक्षावाल्याकडे गेली नसल्याची माहिती सदर रिक्षावाल्याने या महिलेच्या नातेवाइकांकडे बोलताना दिली होती.

सदर महिलेचे माहेर कुडाळ तालुक्यातील आकेरी हे असून तिचे माहेरचे नाव सीमा डिचोलकर असे होते. लहान असताना ती सावंतवाडी शहरांमध्ये मसाल्याच्या दुकानात कामाला येत असे. विवाहानंतर बिनसल्याने ती आपल्या मुलासह मळगाव येथे राहत होती.या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन युवकां बरोबरच लक्ष्मण उर्फ योगेश रवींद्र आडणेकर ( २३, रा. कोलगाव ता.सावंतवाडी ) व योगेश सुभाष कांबळे ( २३, रा. गरड सावंतवाडी) या सर्वांवर भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली.

आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर खोल दरीत एका महिलेचा मृतदेह असल्याचे पर्यटक युवकांना दिसून आला होता.तो पोलिसांनी बाहेर काढला आणि चौकशी सुरू केली.मात्र, बरेच दिवस सदरच्या मृतदेहाची ओळख पटू न शकल्याने व मृतदेहाला ही बरेच दिवस उलटल्याने अखेर सावंतवाडी पोलिसांनी मृतदेहाचा अंत्यविधी आटोपला होता. तर महिलेचा व्हीसेरा उत्तरीय तपासणीसाठी लॅब मध्ये पाठविण्यात आला होता.

याप्रकरणी तपास करताना आंबोली दूरक्षेत्र, बांदा पोलीस नाका तसेच आरोंदा व सातार्डा पोलीस नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली होती. सदर महिलेच्या अंगावर सापडलेले कपडे व इतर वस्तू यावरूनही तपास केला जात होता. याच दरम्यान, सोमवारी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी अत्यंत कौशल्याने या प्रकरणी तपासात अचानक गती घेत शहरातील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. या चौकशीत पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे सापडल्यानंतर अन्य तिघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.

महिलेच्या अंगावरील कपडे व इतर चीजवस्तू त्यांचेही फोटो ओळखीसाठी व्हायरल करण्यात आले मात्र त्यातूनही कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. मोबाईल डम्प डाटाच्यामाध्यमातूनही तपास केला गेला.अखेर पोलिसांच्या हाती लागला सुगावा
या प्रकरणी उपनिरीक्षक अमित गोते यांच्यासह पोलिसांचे पथक रात्रंदिवस कार्यरत होते. अखेर पोलिसांच्या हाती एक सुगावा लागला व त्याच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी सावंतवाडी गरड परिसरातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रातोरात कोलगाव येथील अन्य एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मंगळवारी सकाळी या प्रकरणातील अन्य दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. काल मंगळवारी रात्री उशिरा या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील संशयित युवकाने दिलेल्या कबुली नुसार हे युवक संबंधित महिलेला घेऊन आंबोली येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, त्याठिकाणी तिचा मृत्यू झाल्यामुळे तिचा मृतदेह आंबोली येथील खोल दरीत फेकल्याची माहिती त्यांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरचे चारही संशयित युवक हे अवैध धंद्याशी निगडित असून शहरातील अनेक युवक या धंद्यात गुंतले आहेत, असे चौकशीत समोर आले, त्यामुळे पुढील चौकशीत आणखी ही काही गळाला लागण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आंबोलीतील त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अमित गोते यांच्याकडे होता. तर मळगाव येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा तपास हा उपनिरीक्षक नवनाथ शिंदे यांच्याकडे होता.
सुरुवातीला याप्रकरणी कोणतेही धागेदोरे नव्हते. मात्र, बेपत्ता असलेल्या मळगाव येथील महिलेचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर काही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले. यात डमडाटाचे डिटेल्स पडताळणी केले असता सावंतवाडी गरड परिसरातील एक लोकेशन ट्रेस झाले. संबंधित मोबाईल कनेक्शनची पडताळणी केल्यानंतर या व्यक्तीचा सदर महिलेशी काय संबंध याचा तपास केला असता संशयाची पाल चुकचुकली व तपासासाठी सोमवारी सायंकाळी गरड येथील संबंधित युवकास ताब्यात घेण्यात आले. अखेर त्याने दिलेल्या कबुली नंतर या प्रकरणातील अन्य संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

आंबोली दरीत सापडलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणी कोणतेही धागेदोरे नसताना केवळ २१ दिवसात पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने तपास करून आरोपींना गजाआड करणारे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांचे कौतुक होत आहे.पोलीस निरीक्षक शशीकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमित गोते,सहा . पोलीस निरीक्षक तौफीक सयद,पोलीस कर्मचारी शरद लोहकरे, प्रसाद कदम,दीपक लोंढे, नवनाथ शिंदे, सतीश कावीटकर,दर्शन सावंत, महेश जाधव, दीपक सुतार यांनी या प्रकरणाच्या तपासात सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here