सिंधुदुर्ग – जिल्हयात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे कणकवली तालुक्यातील गोर गरीब शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यामध्ये शेतीला कीड लागणे,शेती काळी पडणे तसेच शेतीत पाणी साचून पीकांचे नुकसान होत असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेती पूर्ण होवून देखील हातातोंडाशी आलेले पीक उध्वस्त होताना दिसत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी कणकवली पंचायत समितीचे माजी उप सभापती बुलंद पटेल, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, संजय सावंत, संतोष आग्रे, राजू पेडणेकर, आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण कणकवली तालुक्यातील शेतीची प्रत्यक्ष पहाणी करून स्थानिक पातळीवरच पंचनामे करून त्यानुसार त्यांची नुकसानभरपाई तात्काळ मिळेल, यासाठी प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर पाठपुरावा करावा. जेणे करून गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची किमान भरपाई तरी मिळेल. आणि संबंधित शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.