१०७ वर्षांचा सिनेमा

0
213
 कै. धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे आद्यप्रवर्तक समजले जातात आणि त्यांनी निर्माण केलेला `राजा हरिश्चंद्र’ हा भारताचा पहिला चित्रपट (मूकपट) मानला जातो. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती अत्यंत भिन्न आहे आणि तीच चित्रपटरसिकांसह लाखो लोकांच्या नजरेस आणण्याचा हा एक प्रयत्न.
कै. फाळके यांच्या `राजा हरिश्चंद्र’चे ३ मे, १९१३ या दिवशी मुंबईतील `कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ’च्या प्रेक्षागृहात प्रदर्शन करण्यात आले. परंतु कोकणच्या एका सुपुत्राने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आपला `पुंडलिक’ हा चित्रपट (मूकपट) याच `कोरोनेशन  सिनेमॅटोग्राफ’च्या पडद्यावर आणि तोही `राजा हरिश्चंद्र’ झळकण्यापूर्वी एक वर्ष म्हणजे १८ मे, १९१२ या दिवशी मुंबईकरांना दाखविला होता. तो मूकपट म्हणजे  `पुंडलिक’ आणि हे अद्वितीय माध्यम लोकांपुढे सादर करणारा तो कुशाग्र बुद्धीचा तरुण म्हणजेच भारतीय चित्रपटाचे आद्यप्रवर्तक कै. रामचंद्र गोपाळ उर्फ दादासाहेब तोरणे हे होत. `पुंडलिक’ची लांबी तो २० मिनिटे चालेल इतकी होती. `पुंडलिक पाहिल्यावर प्रेक्षकांनी दादासाहेब तोरणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले. हा मूकपट दोन आठवडे चालला. `पुंडलिक’ची जाहिरात १८ मे, १९१२ रोजी `टाइम्स ऑफ इंडिया’ या भारदस्त इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती ; इतकेच नव्हे तर याच वृत्तपत्राच्या २५ मे, १९१२ च्या अंकात `पुंडलिक’चे समीक्षणही छापून आले होते.
कोकणातल्या सुकळवाड या खेड्यात जन्मलेला आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी पितृछत्र हरपलेला तरुण नशीब अजमावण्यासाठी आपल्या मातेला घेऊन मुंबापुरीत येतो काय आणि चित्रपटासारखे सगळयांनाच नवलाईचे असणारे अभूतपूर्व दालन खुले करून देतो काय ! सारेच  स्वप्नवत वाटणारे पण प्रत्यक्षात घडलेले !
असा हा भारतीय चित्रपटसृष्टीला ललामभूत ठरलेला `पुंडलिक’ येत्या १८ मे, २०१९ रोजी १०७ वर्षांचा होत आहे आणि असे असूनही त्याचे जनक कै. दादासाहेब तोरणे हे भारतीय चित्रपटाचे पितामह गणले जाण्यापासून दूरच राहिले आहेत, ही खेदाची बाब नव्हे काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here