महाराष्ट्र राज्यात बहुसंख्य मतदारसंघांत नोटा वर मतदान 

0
117

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात सर्वपक्षीय उमेदवारांबाबत नाराज असलेल्या मतदारांनी थेट नोटा वर आपल्या मतांची मोहोर उमटवित नाराजी व्यक्त केली आहे. बहुसंख्य मतदारसंघांत जवळपास पाच हजार किंवा त्याहून अधिक मते नोटाला मिळाली आहेत. मतदारांची हि नाराजी अनेक उमेदवारांच्या जय पराजयात महत्वाची भूमिका बजावणारी ठरली.

राज्यात कडेगाव-पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजित कदम एक लाख ५० हजार ८६६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. मात्र, या मतदार संघात कदम यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला तब्बल २० हजार ६३१ मते पडली असून, अन्य उमेदवारांना १० हजार पेक्षा कमी मते पडली आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे धीरज देशमुख एक लाख १८ हजारच्या मताधिक्याने विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेचे सचिन उर्फ रवी देशमुख यांचा पराभव केला. याही मतदार संघात तब्बल १३ टक्के म्हणजेच २७ हजार २८७ मते नोटावर पडली आहेत. तर सेना उमेदवारास फक्त १३ हजार ३३५ मते मिळाली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघात तीन हजारहून अधिक, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदार संघातही चार हजारहून अधिक मते नोटावर पडली आहेत. सत्ताधारी पक्षात सार्वधिक मताधिक्य भाजपाचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना एक लाख ३१ हजार मतांचे मिळाले आहे. मात्र, याही मतदार संघात सहा हजार ७८३ मतदारांनी नोटावर मत नोंदणी केली आहे. अक्कलकुवा मतदार संघातही शिवसेनेचे अमशा पाडवी यांना काँग्रेस उमेदवार के.सी. पाडवी यांच्याकडून केवळ दोन हजार ९६ मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याही मतदार संघात नोटावर चार हजार ८५७ मते पडली असून येथेही जय-पराजयात नोटाची भूमिका महत्वाची ठरली आहे.

बोरीवली मतदारसंघात १० हजारांहून अधिक मते नोटावर पडली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दौंड मतदारसंघातून भाजपाचे राहुल कुल केवळ ७४६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. या ठिकाणी कुल यांना एक लाख तीन हजार ६६४ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना एक लाख दोन हजार ९१८ मते मिळाली तर या ठिकाणी नोटावर ९१७ मते पडली. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातही १२ हजार मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. समाज माध्यमांवरील आवाहन आणि योग्य पर्याय नसल्यानेच काही मतदारसंघांमध्ये मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असण्याची शक्यता आहे. आरेची वृक्षतोड किंवा अन्य काही मुद्दय़ांवर नोटाचा वापर करण्याचे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here