बदलत्या हवामानामुळे सध्या मच्छीमारांना मच्छी मिळेनासी झाली आहे. त्यामुळे कोकणात सध्या मत्स्य दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीच्या तुटवाड्यामुळे बाजारात मच्छीचे दर गगनाला भिडल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसत आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे किनारी भागात मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, सध्या या कोळी बांधवांना समुद्रात मासे मिळेनासे झाले आहेत. खरंतर चालू हंगामात किनाऱ्याजवळ मोठया प्रमाणावर मासळी येत असते. परंतु, बदलत्या हवामानामुळे मासे किनाऱ्याजवळ येत नाहीत. दुसरीकडे क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अर्धा हंगाम वाया गेला आहे. त्यात आता मासे मिळत नाहीत, त्यामुळे माशांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी मच्छीचे दर हे खरेदीदारांच्या आवाक्यात होते. पूर्वी पापलेट 700 रुपये किलो होता, त्याचा सध्याचा दर 1300 रुपये किलो इतका आहे. सुरमई पूर्वी 400 ते 500 रुपये किलोने मिळत होती, आता तीच सुरमई 800 रूपये किलोला मिळत आहे. कोंळबी पूर्वी 200 किलोने मिळत होती, तिथे आता 350 रूपये किलो दर कोळंबीला मोजावा लागत आहे. बांगडा 70 रूपये किलोने मिळायचा आता 200 रूपये किलोने मिळत आहे. सौंदाळा यापूर्वी 90 रूपये किलो होता, आता तो दर 350 रूपये किलो इतका झाला आहे. अनेक मच्छीमारांना समुद्रात जाऊनही मासेच मिळत नसल्याने, खर्च कसा भागवायचा हा प्रश्न नौका मालकांना पडला आहे. त्यामुळे सध्या मासेमारी करणाऱ्या नौका किनाऱ्यालाच लागलेल्या पाहायला मिळत आहेत. मासळीच्या दुष्काळामुळे पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे खवय्यांना इतके महाग मासे खावेत कसे, असा प्रश्न पडला आहे.