अखेर दारिस्तेतील स्वप्नाली सुताराचा वनवास संपला, केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्पाने साधली किमया

0
177

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातल्या दारिस्ते गावची स्वप्नाली सुतार ह्या विद्यार्थिनीच्या डोंगर माथ्यावरील ऑनलाइन अभ्यासाची बातमी प्रसारित झाली होती. तिच्या अडचणी वर मात करण्याची किमया केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्पाने साधली आहे. स्वप्नाली सुतार ही मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे . लॉकडाऊन मुळे गावात अडकलेल्या या मुलीचा ऑनलाइन अभ्यास गावात इंटरनेट नसल्याने उंच डोंगरावर जाऊन मिळणार्‍या नेटवर्क वापरून पूर्ण करावा लागत होता . यासाठी जंगल भागातील तिच्या अभ्यासासाठी बांधलेल्या झोपडीत पूर्ण दिवस बसावे लागत होते .या गुणवंत मुलीच्या ऑनलाइन स्टडीची समस्या जेव्हा बातम्यांमध्ये प्रसारित झाली तेव्हा त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने त्वरित घेतली . यानंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , सीएससी ई-गव्हर्नन्स चे सीईओ डॉक्टर दिनेश त्यागी , राज्य समन्वयक वैभव देशपांडे , कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांचा प्रतिसाद आणि प्रयत्नामुळे स्वप्नालीची समस्या दूर झाली . भारत नेटची टीम दारीस्ते या दुर्गम गावात पोहोचली. ग्रामपंचायत दारिस्ते येथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी जोडण्याचे पहिले उद्दिष्ट ठरविले. केंद्र स्तरावरून आणि राज्य स्तरावरून तांत्रिक मदत टीमला मिळाल्यामुळे ग्रामपंचायत येथे इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आले . त्यानंतर स्वप्नाली च्या घरापर्यंत इंटरनेट स्थापन करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ओढत नेऊन स्वप्नाली च्या घरी सर्व अडथळ्यांना पार करीत अखेर इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आले. दोन दिवसांच्या धडक कारवाईमुळे स्वप्नाली स्वतःच्या घरात बसूनच बक्षीस म्हणून मिळालेल्या लॅपटॉप व मोबाईल द्वारे कॉलेजमधील सर्व ऑनलाईन क्लासेस अटेंड करू लागली आहे. तिच्या पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here