सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कातळशिल्पाच्या माध्यमातून अश्मयुगीन पाऊल खुनांचा ठोस पुरावा आढळू लागला आहे. मालवण नंतर आता देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळावर कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावच्या महत्वामध्ये त्यामुळे आणखीनच भर पडली आहे.
प्रागैतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.
साळशी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होत. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखीनच वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडतात.
याच साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे साळशीला लागून असलेल्या कोळोशी गावात काहीवर्षांपूर्वी एक गुहा सापडली. या गुहेबाबत संशोधन झालं. या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे येथील संशोधनाला नवा दुवा मिळाला आहे. विशेष म्हणजे याच शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. अनेकवेळा जनावर पडून मृत झाल्याने स्थानिक गुराख्यानी माती दगड टाकून काही प्रमाणात हि गुहा बुजवली आहे.
यावेळी बोलताना येथील तरुण निसर्गप्रेमी अभ्यासक संतोष गावकर म्हणाले कि, या कातळशिल्पाच्या बाबतीत आम्ही तज्ञ मार्गदर्शकांशी संपर्क साधला आहे. या शिल्पाचा अभ्यास सुरु असून लवकरच आम्ही याबाबतीत ठोस माहिती लोकांसमोर आणू असं ते म्हणाले.
तर स्थानिक नागरिक असलेले प्रणव नाडनकर म्हणाले, आमच्याकडे जैन संस्कृतीच्या पाऊलखुणाही सापडतात. आमच्याकडे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो असं वाटत होत. कारण अन्य भागात कातळशिल्प सापडत असताना आपल्याकडेही ती असतील असा आमचा अंदाज होता. आता हे कातळशिल्प सापडल्याने या भागातील नवा ठेवा समोर आला आहे.
कोकणाचा उल्लेख पुराणातही सापडतो. सप्तपाताळातील कोकण हे एक पातळ म्हणून ओळखलं जात. या पाताळात आणखीन काय काय दडलं आहे ते या शिल्पांच्या संशोधनातून समोर येऊ शकत.