ढोलांवर काठी बसते. आसमंत आवाजाने दुमदुमून जातो. जयजयकाराचा गजर होतो आणि देवाची स्वारी भक्तांच्या भेटीला मंदिरातून बाहेर पडते. सर्वत्र मंगलमय वातावरण असते. वैशाख वणव्यातही हर्ष चोहोकडे भरलेला असतो. या भारलेल्या वातावरणात अनवाणी देवाचे तरंग घेऊन चालणारी मंडळी चव्हाटय़ाकडे मार्गक्रमण करू लागतात. ऊन वाढत जाते. मात्र रहाटीचा हा लवाजमा ढोलांच्या नादमय सुरात पावले टाकतच असतात.यामध्ये सहभागी झालेले सर्वच जनसामान्य भक्तीच्या लाटेत हिंदोळत असतात. चव्हाटय़ावर देवतरंग स्वारीचे आगमन होते आणि शिमगोत्सवास ख-या अर्थाने प्रारंभ होतो. गावागावात या शिमग्याच्या प्रथा वेगवेगळय़ा आहेत. परंतु तळकोकणात बहुतांश गावामध्ये देवस्वा-यांची तरंग काठी चव्हाटय़ावर दाखल होते आणि होळी उत्सव सुरू होतो.गाबतांचा शिमगोत्सव तसा प्रसिद्ध आहे, तसेच या शिमगोत्सवातील गीतेसुद्धा. तर खारेपाटणपासून रत्नागिरीपर्यंत देवतांची पालखी रूपे लावून रयतेच्या दारात पोहोचलेली असते. लोकांनी लोकांसाठी आपल्या ग्रामीण बोलीमध्ये तयार केलेल्या वर्षानुवर्षाच्या गीतरचना येथे पुन्हा पुन्हा रुं जण घालतात. परंपरांनी समृद्ध असलेला हा शिमगोत्सव गावन्गाव एका वेगळय़ाच सोहळय़ाने, आनंदाने न्हाऊन निघतो.
3गावापुढे अनेक समस्या आहेत. निसर्गाची अनेक संकटे आहेत. अनेक प्रश्न आहेत. मात्र या होळीच्या उत्सवात कुठेही कमी पडू नये याचीही दक्षता घेण्यात गावक-यांचा पुढाकार आहे. शहरातल्या होळीप्रमाणे आमच्या मुलखात होळी उत्सव होत नाही, रेनडान्स रंगत नाही. आमच्याकडे धूळ फेकली जाते. झाडे जाळली जात नाहीत आणि तोडण्याचे प्रमाणही कमी आहे. एका गावात एकच गावहोळी उभी केली जाते. वाडी-वस्तीवर छोटय़ा छोटय़ा राखणे होळी असतात. परंतु या होळय़ा तोडतानाही पर्यावरणाची दखल घेतली जाते. वारसा जपण्याचा प्रयत्न असतोच. माहेरवाशिणी या दिवसांत अगदी आग्रहाने आपल्या घरी येतात. चाकरमानी उत्सवाच्या निमित्ताने गावी पोहोचण्यासाठी धडपडत असतात. शिमग्यात गावच्या हौशी कलावंतांची मजाच असते. ज्याने जसे जमेल ती कला सादर करावी. मग कुणी नाच्याचे सोंग घेतो तर कुणी गाणं म्हणू लागतो.
देवाची भेट प्रत्येक घराघरांत व्हायला हवी यासाठी पूर्वजांनी गावोगावी वेगवेगळय़ा परंपरा केल्या आहेत. कुठे ग्रामदेवतेचे दर्शन देण्याच्यानिमित्ताने देवीची तळी घराघरांत फिरवली जाते तर कुठे देवस्वारीच रायतेच्या भेटीला रवाना होते. कुठे देवाचे निशाण प्रत्येक घरात उत्सवासाठी पोहोचते. या परंपरांना गावोगावी वेगवेगळी नावे आहेत. पण घराच्या अंगणात उत्सवाचा दिमाख रंगतो. काही मिनिटे मनोरंजनाचा प्रयत्न होतो. श्रद्धावंतांना देवत्वाची अनुभूती येते. कलावंतांच्या कलेची कदम होते. मजा करणा-यांना आनंद मिळतो.
एकूणच सर्वच जण आनंदीत असतात. ‘शबय’ या शब्दाला या दिवसांत मोठी किंमत मोजावी लागते. आमच्या मुलखात फाल्गुन महिन्यापासून उत्सवाला खरी सुरुवात होते. हुताशनी पौर्णिमेपासून लोकोत्सवाला जरी प्रारंभ झाला तरी त्यापूर्वीच मांडावर शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. वाडी-वस्तीवरची मंडळी मांडावर जमू लागतात. हा मांड म्हणजेच त्या वाडीतील ते एक प्रतिष्ठित स्थान असते. पूर्वी कधीतरी त्या घराण्यातील अथवा त्या जागेवर सर्व वस्तीवरच्या मंडळींसाठी विशेष कार्यक्रम करण्यासाठी पुढाकार घेतला जायचा म्हणून ती जागा मांड म्हणून प्रसिद्ध व्हायची. या मांडावर शिमग्याच्या अगोदर उत्सवाची जमवाजमव सुरू होते.
डफावर थाप कोण मारणार त्यापासून ते यावर्षी राधा कोण होणार याबाबत स्पर्धा सुरू होते. गावात चार-दोन मांड असतातच; मग या मांडांवर अधिकाधिक सरस कार्यक्रम करण्यासाठी स्पर्धा सुरू होते, ईर्षा रंगते. आपल्या मांडावर नाचणारी गवळण ही पुरुष पात्रच असते. मग, इच्छुक पुरुषांमध्ये आपल्या मांडावर त्यांनी नाचगाण्यात सहभागी व्हावे यासाठी मोठी बिदाई दिली जाते. ठाकर परिवारातील मंडळी या कलाप्रकारात पुढे असतात. यातील नृत्यकलेची थोडीफार माहिती असणा-या मंडळींना मोठा सन्मान असतो. त्यासाठी मोठी किंमत मोजली जाते. आठ दिवसाच्या उत्सवासाठी ही मंडळी सांगतील ती रक्कम देण्याची स्पर्धा रंगते.
एकदा का हे गवळणीचे काम करणारा नाच्या तयार झाला की ही अर्धी लढाई मांडक-यांनी जिंकलेली असते. आमच्या मांडावरचा नाच्या अमुक आहे. अमक्याच्या मांडावर असे नाच-गाणे होईल, अशी खुमासदार चर्चा सुरू होते. अलीकडे आपण पाहतो, आयपीएल किंवा इतर क्रीडाप्रकारात आपल्या संघात खेळाडू यावेत म्हणून बोली लावली जाते. पण गेल्या ५० वर्षापासून आमच्या मुलखात एखादा कलाकार आपल्याला हवा म्हणून अशीच थेट बोली लावण्याची परंपरा आहे. आजही त्याचा वापर केला जातो. होळी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर मांडावर धार्मिक परंपरांप्रमाणे उत्सव सुरू होतो. गण, गवळण नाच-गाणे याची मैफीलच रंगते. होळी उत्सवाचे नऊ दिवस, कुठे सात दिवस ही मोठी पर्वणी असते. एक लोकोत्सवाचा पूर्वजांनी तयार केलेले हे व्यासपीठ म्हणायले हवे.
गावची घडी बसवताना ग्रामदेवतेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. किंबहुना हाच केंद्रबिंदू मानून गावाची घडी कर्त्यां माणसाने बसवली आहे. त्याला धार्मिकतेचा पदर जोडला गेला आहे. श्रद्धेला भक्तीची आणि भीतीचीही किनार लावली गेली आहे. या उत्सवात शिमग्याचे वार्षिक खूपच वेगळे आणि आगळे असते. गावातील ग्रामदेवतांची मंदिरे शक्यतो गावाच्या एका बाजूला अथवा गर्द वृक्षराईत वसलेले आहेत. अलीक डे गावाची रचना बदलते आहे. खेडी कात टाकू लागली आहेत. यामुळे गावागावात ग्रामदेवतांची एका बाजूला असणारी मंदिरे आता गावात मध्यभागी येऊ लागली आहेत. म्हणजे त्यांनी स्थान सोडले असे नाही तर वाडी-वस्ती विस्तारू लागली आहेत. तर या मंदिरातून होळीच्या आदल्यादिवशीच ग्रामदेवतांची तरंगस्वारी गावच्या चव्हाटय़ावर रवाना होते. हा चव्हाटा म्हणजे गावचे मध्यवर्ती ठिकाण, गावातील चार दिशांच्या चार वाटा एकत्र होण्याचा भाग. या चव्हाटय़ावर तरंग स्वारी पोहोचतानाही काही परंपरा आहेत. प्रत्येक गावात वेगवेगळय़ा प्रथा आहेत. काही ठिकाणी देवतांची स्वारी मजल दरमजल करत एक-दोन दिवसांची विश्रांती घेत प्रवास करत आहेत. काही ठिकाणी थेट मिरवणुकीने देव चव्हाटय़ावर पोहोचतात. या चव्हाटय़ावर देव पोहोचल्यानंतर रंगणारा उत्सव दिवसरात्र सुरू असलेली गजबज अनुभवण्याजोगी असते. धार्मिक परंपरांना लोकांच्या एकजुटीचे बळ लावले जाते. प्रत्येक परंपरा ही कोणी एकटय़ाने करायची नसते.
गावातील सर्व मंडळी कोणत्या कोणत्या निमित्ताने एकत्र यायला हवीत, त्यांच्यात चर्चा व्हायला हवी, संवाद घडायला हवा. यासाठी पूर्वजांनी कुशलतेने या उत्सवाची वीण गुंफली आहे. या चव्हाटय़ावर तरंग स्वारीच्या समोर गावमेळे चालतात. हा गावमेळा म्हणजे गावातील एखाद्या समस्येविषयी अथवा गावावर येणा-या एखाद्या संकटाविषयी गावाने एकत्र विचारमंथन करून घेतलेला निर्णय असतो. काही भागात चव्हाटय़ावर होळीच्या ठरावीक दिवशी गावमेळय़ांमध्ये जनतेच्या अनेक समस्या मांडल्या जातात आणि त्यावर तातडीने निर्णय घेतला जातो. कधी कधी एखाद्या व्यक्तीला अथवा संबंधित जबाबदार यंत्रणेला कडक शब्दांत सुनावले जाते.
कधी कधी शिक्षाही दिली जाते. गावाची घडी सामाजिक सलोखा विस्कटू नये यासाठीच ही सगळी तडजोड असते. एकीकडे हे सामाजिक भान जपले असताना दुसरीकडे शिमगोत्सवात कला संस्कृती उजळून निघते. आता मनोरंजनाची अनेक माध्यमे आली आहेत. प्रत्येक घरात टी.व्ही. पोहोचला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मंच आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात जसा संपर्क साधता येतो तसेच मनोरंजन करण्यासाठी विविध पर्यायही आले आहेत. परंतु जेव्हा मनोरंजनाचे कोणतेही पर्याय नव्हते. या गावातून त्या गावात संपर्क साधायचा म्हटला तरी दिव्य असायचे. अशा वेळेपासून सुरू झालेला शिमगोत्सवातील नाच-गाण्याची अथवा रोंबाटाची, शबयची महती काही कमी झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आजची पिढी या परंपरांपासून अलिप्त असली तरीही यामागची पूर्वजांची भूमिका समजून घेणे महत्त्वाचे वाटते. या मांडावरच्या उत्सवात अथवा चव्हाटय़ावरच्या रोंबाटाची तिथल्या शबयच्या ठेक्याची राधा-कृष्णाच्या नाचाची, सोंगाडे पाहणे मोठे अपूर्वाईचे असते.
शबय, शबय
शिमगोत्सवात काही ठिकाणी होळी पेटविली जाते. तर अनेक भागामधून झाडाची होळी उभारली जाते. सांगेलीच्या गिरोबा देवस्थानात तर फ णसाचा गिरोबा तयार केला जातो. त्याला मग वाजत गाजत होळीसारखा आणला जातो. आणि मंदिरात त्याची प्रतिष्ठापना केली जाते. अनेक गावांमधून गावहोळी म्हणून कु ठे आंब्याच्या झाडाची तर कुठे साग, माड अथवा पोफळीची होळी घातली जाते. आंब्याच्या पानांनी होळीचा काही भाग सजवला जातो आणि मग होळी पौर्णिमेदिवशी ठरलेल्या ठिकाणांहून होळीची उभारणी होते. या होळी उत्सवात होळीची उभारणी झाली की मग विधीवत परंपरा सुरू होतात. आगडोंब करून एकमेकांच्या नावाने बोंबा मारण्याचा प्रकार या मुलखातल्या होळीमध्ये होत नाही. विशेषत: दक्षिण कोकणच्या इलाख्यात होळीचा उत्सव वेगळय़ा परंपरेत साजरा होतो. होळी सुरू झाल्यापासून चव्हाटय़ावरचे कार्यक्रम संपेपर्यंत अथवा गुढीपाडव्यापर्यंत उत्सवाची नशा चढलेली असते. शबय हा शब्द या दिवशी अनेकांच्या तोंडी असतो. शिमगोत्सवात हक्काने पोस्त मागण्याची ही प्रथा आहे.
रोंबाट
आमच्या मुलखात गाव तेथे ग्रामदेवता आहे आणि जिथे ग्रामदेवता आहे तिथे त्या देवतांचे स्वतंत्र वाद्यवृंद आहे. पूर्वी या वाद्यवृंदाची जबाबदारी हरिजन बंधूंनी स्वीकारलेली होती. मात्र काही गावांमध्ये काळाच्या ओघात त्यांनी ती जबाबदारी बाजूला केली. आता देवाचा ढोल अमुक एकानेच वाजवायला हवा असा अट्टाहास असत नाही. ज्याला जे शक्य आहे, तो तो ढोलावर थाप मारण्याचा प्रयत्नात असतो. शिमग्यात सगळे रोंबाटच असते. कुठे कुठे अग्निदिव्य केले जाते. बनाटींना कापडाचे बोळे बांधून हा आगीचा खेळ केला जातो. तर कुठे शक्ती-तु-यांचे कार्यक्रमही रंगतात. हा शिमगा विविध अंगांनी विविध ढंगांनी पाहण्यासारखा असतो. पण यासाठी मुलखात पोहोचायला हवे. वेशीवरून तो अनुभव घेता येणार नाही आणि समजणारही नाही.
रयतेचा उत्सव देव साक्षीदार!
शिमगोत्सव म्हणजे उत्सव आणि परंपरेचा अनोखा संगम. कुणा एकटय़ाचा हा उत्सव नाही. सारा गाव शिमगोत्सवात भारून जातो आणि एकोप्याच्या वातावरणात घर अन् घर सजून जाते. मग शिव्यांच्या ओव्या होतात. शबयचा हक्क प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. शब्दाला किंमत किती असते हे यावेळी प्रकर्षाने जाणवते. देवतरंगांची स्वारी रयतेला भेटायला वाडी-वस्तीत पोहोचते. एरव्ही ग्रामदेवतेच्या मंदिरात असणारी शांतता चव्हाटय़ावर कुठच्या कुठे पळालेली असते. चव्हाटा हे एक गावाचे व्यासपीठ होते आणि होळीचे सात ते नऊ दिवस रंगून जातात.
घराघरात खेळे दाखल होतात. चव्हाटय़ावर ढोलांचा गूढ नाद घुमत राहतो. सकाळची नौबत.. सायंकाळची प्रार्थना आणि अवसरी नाद.. धूप आणि घंटानादाबरोबर ढोलांचा एक ताल वातावरण गंभीर करतो. सारं काही विलक्षण आणि हवेहवेसे वाटणारे..
घराची अंगणे मुलांच्या नाचगाण्याने रंगून जातात.
कुंदूस कुंदूस बया रडते
घरी येतेस की नाय गं
पायातली पैंजण तुला देते
घरी येतेस की नाय गं..
हातातली अंगठी तुला
देते घरी येतेस की नाय गं
या गीतांबरोबरच काही ऐतिहासिक तर काही मार्मिक गीतांचे सूर घुमू लागतात. काही सोंगे अक्षरश: धिंगाणा घालतात.
वाळकेश्वरी हवा डोंगरी बंगला बांधला वरच्यावरी या बंगल्याला रंग काढला पिवळा, हिरवा, लाल गं गोमू गोमूची शिमगोत्सवात चंगळच असते. वाडीतली मुले जमा होतात आणि एका मुलाला साडी नेसवतात. त्याच्या डोक्यावर मुकुट चढविला जातो. इतर काही जण मुखवटे परिधान करतात. सारा सरंजाम तयार होतो. मग हा चमू घरोघरी फिरू लागतो. गोमू झालेल्याला मोठा मान असतो. काही घरात त्याचे मोठे स्वागत होते. खास खाऊही दिला जातो. लहान मुलांच्या खेळात असणारी ही परंपरा मोठय़ा मंडळींमध्ये बदलते. मोठय़ांच्या हातात तळी दिली जाते. तळी घेणा-याचा मान मोठा असतो. त्यात पैसेही टाकले जातात.
कोंबडा आरवला
बाराच्या ठोक्याला
उठा उठा हो
गिरणीचा भोंगा झाला
बायको उठविते
आपल्या नव-याला..
अशी काही गाणी यावेळी सूर धरतात. एका वेगळय़ाच सुरात कुठच्याही नादाशिवाय ही गाणी ऐकतानाही बेसूर वाटत नाहीत.
आमचा गोमू पुढल्या दारी
आणि पाठल्या दारी
तिकडून आला मेला रिक्षावाला
आमच्या गोमूला घेऊन गेला
आमचा गोमू पुढच्या दारी
आणि पाठल्या दारी
गोमू किती सुंदर आहे. तिचे किती लाड केले जातात ही सांगणारी गाणी म्हणतानाच,
कोल्हापुरी मैना हिचे नाव कुण्या गावाला चला तुम्ही याल का?
टोपीवाला पावणा
मला वाटेत भेटला
असे काय करता तुम्ही राव पावणा गावाला चला
तुम्ही याल का?
अशा प्रकारची गाणी शिमगोत्सवातल्या खेळय़ांची रंगत वाढवितात. कुठे कापडखेळे ताल धरतात. तर कुठे रोंबाटाची धमाल असते. कोकण ही भूमी संस्कृतीप्रिय आणि सांस्कृतिकतेची भोक्ती आहे. शिमगोत्सव म्हणजे या लोकोत्सवाचे मोठे व्यासपीठच. प्रत्येक मांडावर अगदी अमेरिकेपासून ते वाडीतल्या अनेक घटनांचा वेध घेणारे मार्मिक सोंग आणले जाते. यात मग ओबामाही सुटत नाही किंवा वाडीतल्या बाळूच्या करामतीही लपवता येत नाहीत. कोकणातल्या या उत्सवात महत्त्वपूर्ण वाद्य असते डफ. एरव्ही वर्षभर विविध कार्यक्रमात या डफाला तेवढेसे स्थान नाही. परंतु, शिगम्यात मांडावर डफ नाही वाजला तर तमाशा रंगतच नाही. अन्य भागात होळीच्या बोंब मारतानाच मोठी होळी पेटविली जाते. मात्र कोकणातल्या अनेक गावांमध्ये होळी पेटविण्याऐवजी आंब्याची पाने बांधून उंचच उंच होळी घालण्याची परंपरा आहे.
होळीच्या आदल्या दिवशी भला मोठा लांबसडक वृक्ष कापावा आणि तो वाजत गाजत गावहोळीच्या स्थानावर आणावा, हे ठरलेले असते. ही गाव होळी घालून झाली की प्रत्येक वाडी-वस्तीवर छोटय़ा छोटय़ा होळय़ा उभ्या होतात. याला राखणे होळी म्हणतात. गावहोळीपेक्षा या होळय़ा अधिक उंच असू नयेत हे परंपरेने ठरलेले असते. विजयदुर्गातला शिमगोत्सव हा फाल्गुन शुद्ध पंचमीपासूनच सुरू होतो. तर वैभववाडीकडील सहय़ाद्रीच्या कुशीतील गावांमध्ये होळीच्या आदल्या दिवशीपासून मांडावर तमाशा रंगू लागतो. जसजसे तळकोकणाकडे सरकावे, तसा शिमगोत्सवाचे रूपडे वेगळे दिसू लागते. नारूरचे रोंबाट तर जगप्रसिद्ध आहे. अख्खा गाव आपापल्या भागात विविध चलतचित्रे तयार करतात. शिगम्याच्या दिवशीपर्यंत आपली चित्रे कशी आहेत, कोणती आहेत याचा ठावठिकाणा लागू नये याची प्रत्येक जण दक्षता घेत असतो.
दुस-यापेक्षा आपले चित्र सरस व्हायला हवे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. घुमटावर हात मारल्याशिवाय वेंगुल्र्यात शिगम्याचा रंग चढत नाही. शिगम्यात पालखी नाचविण्याचा प्रकार खारेपाटणपासून रत्नागिरीपर्यंत अधिकच. पालख्यांना मोठा मान आणि त्या नाचविणा-यांचाही मोठा दिमाख.. तर दोडामार्ग परिसरातील घोडे मोडणी अशीच अनोखी परंपरा आहे. घोडय़ाचे चेहरे कमरेला बांधत तलवारी अशा काही फिरविल्या जातात.
चव्हाटा गजबजला..
शिमगोत्सवात चव्हाटय़ाला किती मोठे महत्त्व असते. चव्हाटय़ावरच्या घडामोडी लक्षवेधी असतात. होळीला नारळांची तोरणे लगडतात. याच काळात दानधर्माची परंपरा वाढते. कारण शबय शिमगोत्सवात मागणे हक्क असल्यासारखी अनेक जण सरसावतात. कुणी त्याला नकार देत नाही. या दिवसात चव्हाटा हा गावाचे हृदय झालेले असते. गावच्या एकूणच जडणघडणीत या चव्हाटय़ाचा वाटा महत्त्वपूर्ण असतो. शिगम्यात तर तो अधिकच झगमगून उठतो. देवतरंगांच्या साक्षीने होळ देवाच्या समोर गावातील सारी जनता एकत्र येते. सात दिवस दिमाखदार सोहळा होतो. हे दिवस म्हणजे गाऱ्हाण्यांचे. समस्त देवांना साकडे घालणा-यांचे. ग्रामदेवता रयतेला भेटायला चव्हाटय़ावर पोहोचलेली असल्याने, या सामाजिक परंपरेतून गावाचा एकोपा वाढविण्याचा प्रयत्न असतो.
खडय़ा आवाजात चव्हाटय़ावर गाऱ्हाणी सुरू होतात. ‘‘बाबा लिंगा गांगो, बाराच्या पूर्वसा.. वशिका, ब्राह्मणा, उगवाई, काळकाई, इटलाई, नवलाई, सातेरी, माऊली, बेळय़ा, जैना, पानपुरका आणि तू चाळय़ा, होळय़ाच्या चाळय़ा, नांद्या कुळकरा, थळकारा, धुळप्यावरच्या देवराया, पावणादेवी, माझ्या आई ..’’ खडय़ा आवाजात देवासमोर गाऱ्हाणी सुरू होतात, प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतेनुसार गाऱ्हाण्यातील देवतांची नावे बदललेली असतात, सूर मात्र तोच असतो आणि मग सारेच जण होयऽऽ म्हाराजा.. म्हणतात. या म्हाराजा म्हणणा-यांच्या लयीतही एक वेगळा विश्वास असतो. या सुरात देवतेकडून रखवालीची हमी घेतली जाते. हा उत्सव समस्त गाववासीयांना वर्षभराची एक शिदोरीच बहाल करत असतो.