कोणत्याही प्रकारच्या टीकेला विकास कामांमधून उत्तर देणे हे महत्वाचे – पालकमंत्री उदय सामंत

0
93

सिंधुदुर्ग – टीका ही राजकीय हेतून होतच राहते. या टीकेला उत्तर देण्याऐवजी विकास कमांमधून उत्तर देणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. झुम ॲपच्या माध्यमातून पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून जिल्ह्यात रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लावल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, मागणी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्याचे संकेत दिले होते. ते पूर्ण करत सध्याच्या कोरोनाच्या काळातही शासकीय वैद्यकीय महाविद्याल मंजूर करण्याचे काम राज्य शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या पद निर्मितीचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मंत्रिमंडळाची मंजूरी मिळेल असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी कमी झाला आहे. त्यावेळी मी जिल्हावासियांना शब्द दिला होता की त्यापेक्षा जास्त निधी मी जिल्ह्यात आणेण. त्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आंगणेवाडीच्या नळपाणी योजनेसाठी 22 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. भालचंद्र महाराज मठासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सावंतवाडी नगर पालिकेस सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कणकवली, कुडाळ, मालवण नगरपालिकांनाही 5 ते 6 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोविड – 19 तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू झाला आहे. जिल्ह्यात रखडलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक, चिपी विमानतळाचे प्रश्न, विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विश्रामगृहांचे नुतनीकरण करण्यासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
आडाळी येथील आयुष्यचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही
सिंधुदुर्गवासियांच्या प्रेमामुळे नव-नवीन कामे करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे होणारा आयुष्य मंत्रालयाचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही. यासंबंधी केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वृत्त हे खोटे आहे. उमेदच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदचे खाजगीकरण होणार नाही असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
टीका करण्यापेक्षा एकत्र विकास करुया
जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध असून जर फक्त टीकेला उत्तरच देत बसलो तर काम कधी करणार असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, विकास कामांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. टीका करण्यापेक्षा काम करुया. मनात आणले तर विकास कामे झपाट्याने करता येतात हे मी घेतलेल्या निर्णयातून दिसून येते. जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा आणि कामे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि यापुढेही याच भूमिकेतून काम करत राहणार असल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here