रंगसंगती कलामंच घेऊन येत आहे एक आगळी वेगळी क्वारंटाइन लघुचित्रपट स्पर्धा

0
117

मुंबई : रंगसंगती कलामंच प्रस्तुत करत आहे क्वारन्टाइन लघुचित्रपट स्पर्धा २०२०.
गेल्या कित्येक वर्षांपासून रंगभूमीशी नाळ जोडल्या गेलेल्या कीर्ती महाविद्यालयातील काही आजी – माजी विद्यार्थ्यांनी रंगभूमीवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला एकत्र आणले आणि प्रत्येकातली कला जोपासली जावी, ती उत्तरोत्तर बहरत रहावी यासाठी “रंगसंगती कलामंच” नावाची संस्था स्थापन केली गेली. या संस्थेने आपला उद्देश कायम ध्यानात ठेवून विविध कलागुणांना वाव दिला आणि कलेच्या सर्वच क्षेत्रात पुढे घवघवीत यश संपादन केलं आणि करत आहेत. एकांकीका, पथनाट्य, व्यावसायिक रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमीवर उत्तम कामगिरी दाखवून एक भला मोठा प्रेक्षक वर्ग गेल्या १० वर्षात या संस्थेने मिळवला.
या संस्थेने हटके अशा संकल्पनांमधून नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले. प्रयोगशील प्रयत्न करत राहणे हे या संस्थेच वैशिष्ट्य आहे. असाच एक अनोखा प्रयोग त्यांनी मागील वर्षी “लघुचित्रपट स्पर्धेच्या” माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला. त्याचं कौतुकही झालं आणि त्याच हटके प्रयोगाचं हे दुसरं वर्ष.
कोरोना सारख्या संकटामुळे ही स्पर्धा यावर्षी करता येण रंगसंगती कलामंचला शक्य नव्हतं पण तरीही त्यावर उपाय शोधून काढत रंगसंगतीने हाच उपक्रम आता चक्क ऑनलाईन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेचा विषयही “होम क्वारनटाइन” असा आहे. यात वेगवेगळ्या संस्थांना आपले लघुचित्रपट ऑनलाईन पाठवायचे आहेत. प्रत्येक लघुचित्रपटाची वेळ मर्यादा ही “तीन मिनिटे” ठरवण्यात आली आहे आणि यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यात सहभागी होणारे प्रत्येक लघुचित्रपट हे “घरात राहून” च चित्रित केलेले असावेत. यात मोबाईलवर चित्रित केलेले लघुचित्रपटही स्विकारले जाणार आहेत. यात सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल ठरवण्यात आली आहे. अंतिम तीन विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येईल आणि परीक्षकांनी निवडलेले १० लघुचित्रपट “रंगसंगती एन्टरटेन्मेंट मंडळ” या फेसबुक पेजवर प्रदर्शित करण्यात येतील. या महोत्सवासंबंधित सर्व माहिती “रंगसंगती कलामंच” च्या इंस्टाग्राम आणि फेसबूक पेजवर आपल्याला मिळवता येईल. सादर होणाऱ्या चित्रपटांच्या परीक्षणाची जबाबदारी सिनेक्षेत्रातल्या दिग्गज दिग्दर्शंकावर सोपवण्यात आली आहे.
रंगसंगती कलामंच या स्पर्धेच आयोजन सरकारने ठरवून दिलेल्या नियमांना अनुसरूनच करत आहे जे कौतुकास्पद आहे. रंगसंगती कलामंचला प्रेक्षकांचा आणि स्पर्धकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद मिळत आलेला आहे आणि तो यावर्षी या अनोख्या प्रयोगाला मिळेल अशी संस्थेतल्या प्रत्येकाला खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here