सिंधुदुर्ग – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना तसेच विधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत राहिलेली प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.
कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 224 असून दोन्ही पालक मयत बालके 16 आहेत.
314 विधवा असून 200 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 12 जणांची खाती उघडण्यात आली असून उर्वरीत 4 जणांची खाती उघडण्यात येणार आहेत.
14 बालकांना 200 किलो तांदूळ, 300 किलो गहू वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वडिलोपार्जित मालमत्ता व इतर संपत्तीवरील हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत वकिलाची नेमणूक करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या, आरोग्य विभागामार्फत उर्वरीत बालकांच्या आरोग्य तपासणीबाबत कार्यवाही पूर्ण करावी. त्याचबरोबर त्यांचे समुपदेशन करावे.
विधवांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत तहसिलदार व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा.
प्रलंबित सर्व प्रकरणे मार्गी लावून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबाबत सर्वांनी तत्परतेने कार्यवाही करावी.