पांढरी चिप्पीला महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष म्हणून दर्जा

0
521

 

सिंधुदुर्ग – कोकणच्या किनारपट्टीवर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारी आढळणाऱ्या पांढरी चिप्पी या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून सरकारने दर्जा दिला आहे. यामुळे कोकणातील कांदळवन संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठे बाळ मिळणार आहे. सोनेरेशिया अल्बा असे या वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे ते फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञ पेरी सोनोरेट यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. विशेष म्हणजे राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

वन विभागाच्या कांदळवन कक्षाने अर्थात मॅंग्रोव्ह सेलने यासंबंधीचा परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र राज्याचा शेकरू हा राज्य प्राणी, जारूळ हे राज्य फूल, ब्ल्यू मोरमॉन म्हणजे निलवंत हे राज्य फुलपाखरु, आंबा या झाडाला राज्य वृक्ष आणि हरियाल पक्ष्याला राज्य पक्ष्याचा बहुमान मिळाला आहे. आता ‘सोनोरिशिया अल्बा’ म्हणजेच ‘पांढरी चिप्पी’ या प्रजातीला राज्य कांदळवन वृक्षाचा मान देण्यात आला आहे. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र ‘कांदळवन कक्ष’ काम करतो. या कक्षाअंतर्गत गेल्यावर्षी राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. पांढऱ्या चिप्पीला ‘राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यासंदर्भातला प्रस्ताव कांदळवन कक्षाअंतर्गत काम करणाऱ्या ‘मॅंग्रोव्ह फाऊंडेशन’मधील तज्ज्ञांनी तयार केला होता.

कांदळवनांना निसर्गाच्या एकंदरीत व्यवस्थेत फार मोठे महत्व आहे. कोकणला ७२० कि.मी. लांबीची समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीची ढाल म्हणजे कांदळवनाचे जंगल आहे. समुद्रातून येणाऱ्या लाटांना ते अभेद्यपणे रोखतात. जमिनीवर तसेच सागरी परिक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या जीवांना आसरा देतात. निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतात. जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात. कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू देतात. असे अनेक फायदे या एकट्या कांदळवणांमुळे होतात.

गेल्या काही वर्षात रायगड आणि मुंबईकडच्या भागांमध्ये कांदळवनांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. मोठ्या संख्येने उभ्या राहणाऱ्या बिल्डिंग आणि त्या उभ्या करणारे बिल्डर यांची महत्वकांक्षा कांदळवणांच्या जीवावर उठलेली आहे. तरीही कांदळवणांच्या संवर्धनासाठी अनेक माणसे जीवाचे रान करून झटताना कोकणात पहायला मिळतात. जगभरात कांदळवनांच्या ६० प्रजाती असून, महाराष्ट्रात २० प्रजाती आढळतात. त्यामध्ये अव्हिसेनिआ मरिना अर्थात तीवर आणि ‘रायझोफोरा म्युक्रोनाटा’ म्हणजे कांदळ या प्रजाती आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसतात. किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना ‘कांदळवन’ म्हटल्यावर या प्रजाती सहज ओळखता येतात. या दोन प्रजातींनंतर सर्वसाधारणपणे दिसणारी प्रजाती म्हणजे चिप्पी होय.

लाल, पांढरी व पिवळी (सोन) चिप्पी अशा तीन चिप्पीच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. यामधील लाल चिप्पी ही दुर्मिळ आहे. सोनचिप्पी जमिनीलगत साधारण गोड्या पाण्याच्या ठिकाणी वाढते, तर पांढरी चिप्पी समुद्राच्या दिशेने खाऱ्यापाण्यात दिसून येते. पांढरी चिप्पी सदाहरित, गडद हिरव्या रंगाची पाने असलेली, रुबाबदार वृक्षासारखी आहे. फुले मोठी पांढऱ्या रंगाची असतात. फळे गोलसर हिरव्या रंगाची असून, ती खाण्यायोग्य असतात. त्यामुळे काही भागांमध्ये या फळांना मॅन्ग्रोव्ह ॲपल किंवा ग्रीन मॅन्ग्रोव्ह ॲपल असे म्हणतात. मूळे जमिनीखाली नसून, ती जमिनीवर एखाद्या काटेरी गालिच्यासारखी पसरलेली असतात.

पांढरी चिप्पी हि कोकणच्या किनाऱ्यावर औषधी वनस्पती म्हणून मानली जाते. पांढऱ्या चिप्पीची कच्ची आणि पिकलेली फळे खाण्यायोग्य असतात. या फळांपासून काही भागांमध्ये व्हिनेगर बनवले जाते. याची फळे पोटातील जंत किंवा खोकल्यासारख्या आजारांसाठी वापरली जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here