कृषी सहाय्यक विशाल हंगे आत्महत्या प्रकरणातील संशयितांना उच्च न्यायालयाचा दिलासा

0
126

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातल्या गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल हंगे याच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या सर्वांना उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल हांगे (मूळ रा. बुलढाणा) यांनी २९ मे रोजी कट्टा येथील भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

यावेळी सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये आपल्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या संशयित आरोपींची नावे त्याने नमूद केली होती. त्यानंतर मयताच्या आईने संशयित आरोपींविरुद्ध विशाल याचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गोळवण सरपंच सुभाष लाड यांच्यासह कृषी पर्यवेक्षक सचिन वसंत गवंडे, गोळवण ग्रामसेविका माधुरी कामतेकर, तलाठी नितीन रेकुळवाड, कृषी सेवक श्रीकांत कोठाळे, कृषी पर्यवेक्षक वासुदेव चौधरी, कृषी सहाय्यक विजय कांबळे यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३०६, ३४ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील सातवा संशयित आरोपी विजय कांबळे यांना अटक करून पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी नंतर जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला होता. तर सहा संशयित आरोपींनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर त्यांच्या शोधासाठी दोन विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यामुळे या संशयितांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याची सुनावणी पूर्ण होऊन या सहाही जणांना उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here