सिंधुदुर्ग : तरेळे – गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 166 जी) या मार्गावर करूळ घाटात रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर चालू असल्याने सदर मार्गावरील वाहतूक 22 जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
करूळ घाटात रस्ता काम युद्धपातळीवर चालू आहे. सदर मार्गाने एकेरी वाहतूक चालू ठेवणे शक्य नाही. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. घाटात रस्ता जेमतेम सात मीटर रुंदीचा आहे. तसेच घाटात तीव्र चढउतार, वेडीवाकडी व धोकादायक वळणे आहेत. अवजड वाहने, ट्रेलर यांची वर्दळ घाटातून असते. या भागात काम सुरू असताना पूर्ण वेळ वाहतूक ठेवणे शक्य नाही. व धोकादायक ठरेल. डोंगराकडील बाजूचे रुंदीकरण व दरीकडील बाजूच्या संरक्षण भिंत बांधण्याचा विचार करता चालू कामांमध्ये एकेरी वाहतूक ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस करताना विना अडथळा होण्याकरता हा मार्ग 22 जानेवारीपासून पूर्णवेळ बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन घेत आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. प्रवासी व अवजड वाहतूकीसाठी तरळे – फोंडाघाट – राधानगरी – कोल्हापूर, प्रवासी वाहतूकीसाठी तरळे – भुईबावडा – कोल्हापूर, प्रवासी व अवजड वाहतूकीसाठी तरळे – वैभववाडी – अनुस्कुरा – कोल्हापूर या मार्गाने वाहतूक करावी.पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे, लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याचे व उभारण्याची कार्यवाही करावी असे ही पत्रात जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.