सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषि औजरे विक्री करणारी दुकाने सुरु ठेवायला परवानगी

0
138

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कृषी अवजारांची विक्री करणारी हार्डवेअर दुकाने तसेच छत्री व रेनकोट यांची विक्री करणारी दुकाने एक आड एक पद्धतीने सुरू ठेवण्याविषयी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. झूम ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यापारी संघटनां सोबत पालकमंत्री सामंत यांनी आज संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले होते. शेतीच्या कामांबाबत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ देणार नाही असे सांगून, पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, शेती अवजारांची तसेच खते बियाणांची वाहतूक याविषयी कोणत्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येऊ देणार नाही. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे छत्री व रेनकोट यांची ही दुकाने एक आड एक सुरू ठेवण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांना सूचना द्याव्यात. कोणती दुकाने सुरू ठेवावीत याविषयी व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी द्यावी. तसेच व्यापाऱ्यांनीही ही कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी. गणेश चतुर्थीच्या काळात आपल्याला जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे त्या अनुषंगाने आतापासूनच तयारी करणे योग्य राहील असेही पालकमंत्री म्हणाले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी व्यापाऱ्यांना व नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही श्री सामंत यांनी यावेळी दिल्या.

यावेळी खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीच्या आधीच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्या नियंत्रित करण्याविषयी सूचना दिल्या. आमदार वैभव नाईक यांनी ई-कॉमर्स विषयी सूचना दिल्या. तर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यां विषयी जिल्ह्याच्या सीमेवर योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here