सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलआंगणेवाडी भराडी देवीचा यात्रोत्सव उद्या दर्शनासाठी नऊ रांगांची व्यवस्था

0
115

 

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेची यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. यावर्षीच्या यात्रेमध्ये सुमारे पंधरा लाख भाविक उपस्थित राहून मातेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी यात्रेदिवशी सायंकाळी चार वाजता भराडी मातेचे दर्शन घेणार असून त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. भाविकांना अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबियांनी एकूण नऊ रांगांची व्यवस्था केली आहे.

पाणीपुरवठा चोख राहणार

दक्षिण कोकणची काशी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या भराडी मातेच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे असून आंगणे कुटुंबीय आणि प्रशासनाच्या मदतीने हा यात्रोत्सव सुरळीत होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. आंगणेवाडीत व्यापाऱयांची लगबग वाढली आहे. आंगणेवाडी ग्रामस्थांच्यावतीने यात्रोत्सवात भाविकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून नळपाणी योजनेद्वारे मोफत पाणीपुरवठा अगोदरपासूनच करण्यात येणार आहे. या याव्यतिरिक्त दररोज तीन टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरण मोहीमही राबविण्यात आली. यात आरोग्य कर्मचारी, बिळवस ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक व आंगणे ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सीसीटीव्हीद्वारे यात्रेवर लक्ष

यात्रेमध्ये सुमारे 40 सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मंदिर परिसर, गाभारा, व्हीआयपी कक्ष, गर्दीची सर्व ठिकाणे, एसटी बस स्टॅन्ड, भाविकांच्या दर्शन रांगा या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून आंगणेवाडी मंडळाच्या कंट्रोल केबिनमधून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व महनीय व्यक्ती यात्रा उत्सवामध्ये यावर्षी येणार असल्याने पोलीस प्रशासनानेही चोख नियोजन केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत. होमगार्ड कर्मचारीही यात्रेमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.

प्लास्टिक मुक्तीसाठी कंबर कसली

आंगणेवाडीत छोटय़ा-मोठय़ा दुकानांचा ओघ पाहता दरवर्षी प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असतो. या वर्षी शंभर टक्के प्लास्टिकमुक्त यात्रा करण्याचा चंग प्रशासन व आंगणे मंडळाने बांधला असून यात्रेमध्ये सर्व दुकानदारांना परवानगी देतानाच प्लास्टिक मुक्तीची अट घालण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास पाच हजार रुपये दंड करण्याची तरतूद प्रशासनाने केली आहे. प्रशासनाच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी विशेष लक्ष दिले आहे. यावर्षी मात्र शिवसेनेच्यावतीने प्रतिवर्षी भरविण्यात येणारी शूटिंगबॉलची अखिल भारतीय स्पर्धा होणार नाही.

बीएसएनएल टॉवर बंदच

गेली अनेक वर्षे आंगणेवाडीत यात्रा कालावधीत बीएसएनएलची सेवा पूर्णत: ठप्प होती. याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रत्येक आढावा बैठकीत बीएसएनएलच्या अधिकारी वर्गाला जाब विचारला. पण संबंधित विभागाकडून कोणतीही कृती झाली नसल्याने हा टॉवर व बीएसएनएल सेवा बंदच आहे. संबंधित अधिकारी मात्र याबाबत पूर्णत: उदासीन असून या टॉवरची सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. स्थानिक आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने जीओचा तात्पुरता टॉवर उभारण्यात आला असून यावेळी आंगणेवाडीत जीओ कंपनीच्या टॉवरची रेंज मिळणार आहे.

बॅनर आणि झेंडे युद्ध

यावर्षी राजकीय पक्षांचे बॅनर युद्ध आंगणेवाडीत पाहायला मिळत आहे. यात्रा ठिकाणी आणि नजीकच्या भागांमध्ये राजकीय पक्षांचे बॅनर व झेंडे लावण्याची एक प्रकारची स्पर्धाच दिसून आली. मसुरेकडील व्हीआयपी मार्गावर ही स्पर्धा यात्रा कालावधीत तीव्र होणार आहे. कारण मुख्यमंत्री याच मार्गाने भराडी मातेच्या दर्शनाला येणार आहेत. ही स्पर्धा लक्षात घेता आंगणेवाडी मंडळाने सर्व राजकीय पक्षांना मंदिर परिसरात झेंडे, बॅनर लावण्यास, घोषणा देण्यास बंदी केली आहे. विविध खात्यांमार्फत आंगणेवाडीत स्टॉल लावण्यात आले असून कणकवली स्टॅण्डच्या बाजूने हे सर्व स्टॉल असून यामध्ये प्रत्येक खात्याच्या विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध असणार आहे. यावर्षी महसूल खात्याकडून कर वसुली केली जाणार नसल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

मंदिर परिसरात विद्युत रोषणाईही आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून यात्रा कालावधीत संपूर्ण मंदिर आणि गाभाऱयामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. तसेच भाविकांना यात्रेमध्ये करायच्या सूचना आंगणेवाडी नियंत्रण कक्षातून करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली असून यात्रा कालावधीत दोन ठिकाणी बुथ लावून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. नऊ रांगांमधून मातेचे दर्शन व ओटय़ा स्वीकारण्याची व्यवस्था तसेच तुलाभार करण्यासाठी खास वेगळी रांग करण्यात आली असून या ठिकाणी भाविकांना सर्व साहित्य मंडळाच्यावतीने देण्यात येणार आहे, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

मालवण, कणकवली, मसुरे स्टॅन्डकडून अविरत एसटी सेवा सुरळीत राहणार असून दुसऱया दिवशीही एसटी सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे. यात्रेमध्ये ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास वितरणही पूर्ण केले असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. महामंडळाच्यावतीने भक्तांचे शुभेच्छा बॅनर यावर्षी आकर्षण ठरणार आहेत.

चाकरमान्यांची लगबग आंगणेवाडीत वाढली असून सर्वांचे आदरातिथ्य करण्यात आंगणे ग्रामस्थ गुंतले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून संबंधित प्रशासन विशेष लक्ष देणार असून आंगणेवाडीत येणाऱया सर्व रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यातून प्रथमच भाविकांना येता येणार आहे. वीज वितरण कंपनीने आंगणेवाडीमध्ये भूमिगत वीजपुरवठा सुरू केला असून सर्व व्यापाऱयांसाठीची वीज मीटर जोडणी पूर्णत्वाकडे गेली आहे.

मुख्यमंत्र्यांचा आंगणेवाडी दौरा 40 मिनिटांचा

मुख्यमंत्र्यांचा आंगणेवाडी दौरा सुमारे 40 मिनिटांचा असून मसुरे स्टॅण्डच्या बाजूने मुख्यमंत्री हेलिपॅडवरून मंदिरामध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री प्रथम भराडी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर ते आंगणेवाडी मंडळ आणि आंगणे कुटुंबियांच्या सभामंडपातील स्टेजवरून आंगणे कुटुंबियांचा सत्कार स्वीकारतील आणि भाविकांना शुभेच्छा देतील. यावेळी आंगणेवाडीसाठी मोठय़ा पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. आंगणेवाडीत श्री देवी भराडी मातेच्या यात्रोत्सवात दर्शन घेणारे ते महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री असणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांनी दर्शन घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here