महाड शहरातील तारिक गार्डन इमारत जेवढ्या वेगात उभी राहिली तेवढ्याच वेगात कोसळली, काजळपुरा दुर्घटनेची आप बिती

0
217
रायगड – निसर्ग चक्री वादळातून सावरणाऱ्या रायगड जिल्ह्यात आणखीन एक सर्वाना हादरवणारी घटना घडली.  महाडमध्ये सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी साळीवाडा नाका काजळपुरा भागातील तारिक गार्डन हि इमारत कोसळली. १० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५ मजली असलेल्या या इमारतीचे ३ मजले पत्त्या सारखे कोसळले. तारिक गार्डन ही दोन विंगची इमारत असून, त्यात ४१ फ्लॅट होते. त्यांपैकी १८ फ्लॅट हे रिकामे होते. इमारतीत ४८ कुटुंबे राहत होती. इमारतीच्या मलब्यातून आतापर्यंत ९ जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर १२ जण मृतावस्थेत सापडले आहेत. अजूनही मदत कार्य सुरु असून इमारतीचं मलबा हटवला जात आहे.
पडलेल्या इमारतीच्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी आणि युनूस शेख अशी त्यांची नावं आहेत. अद्याप दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यासोबतच पोलिसांनी आरसीसी कन्सल्टंटचे बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी घटना घडताच पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून एनडीआरएफच्या ४ पथकांना पाचारण करण्यात आले. एनडीआरएफची पथके तात्काळ घटनास्थळी पोचविता यासाठी तळेगाव ते महाड असा ग्रीन कॉरिडोर ची व्यवस्था करण्यात आली होती. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारत कोसळताच धुरळा उसळला. लोकांच्या किंचाळण्याचा एकच आवाज सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवणार ठरला. स्थानिकांनी सांगितलेली आपबिती अत्यंत भयावह आहे.

आतापर्यंत सापडलेल्या ९ जखमी व्यक्तींचा तपशील

१) नमिरा शौकत अलसूरकर, वय १९
२) संतोष सहानी, वय २४
३) फरीदा रियाज पोरे
४) जयप्रकाश कुमार, वय २४
५) दिपक कुमार, वय २१
६) स्वप्निल प्रमोद शिर्के, वय २३
७)नवीद हमीद दुष्टे, वय ३२
८) मोहमद नदीम बांगी वय ४
९) रुकय्या बांगी वय २

१० मृत व्यक्तींचा तपशील

१)सय्यद अमित समीर, वय ४५
२) नविद झमाने, वय ३५
३) नाैसिन नदीम बांगी, वय ३०
४) आदी हाशिम शैकनग, वय १६
५) शौकत आदम अलसूलकर, वय ५०
६) रोशनबी देशमुख, वय ५६
७) ईस्मत हाशिम शैकनक, वय ४२
८) फातिमा अन्सारी, वय ४०
९) अल्लतिमस बल्लारी, वय २७
१०) एक अनाेळखी स्री चा मृतदेहआहे.

इमारतीच्या पायाच्या पिलरला गेले होते तडे

या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. दुर्घटना घडण्यापूर्वीच काही फोटो समोर आले आहेत. त्यात इमारतीचे पायाकडील पिलरला तडे गेलेले दिसत आहेत. पिलरचे सिमेंट कोसळून पडले असून या फोटोतून हि इमारत केव्हाही कोसळू शकते हे स्पष्ट दिसत आहे.

घटनेपूर्वी इमारत काही मिनिटे हलत होती

दुर्घटना घडण्यापूर्वी हि इमारत काही मिनिटे हलत होती. काही लोकांना वाटलं कि भूकंप झाला. त्यामुळे अनेकांनी इमारतीतून बाहेर पाल काढत सुरक्षित स्थान गाठले. त्यामुळे आपले प्राण वाचल्याचे येथील प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. इमारत बांधणाऱ्या बिल्डरने केवळ एका वर्षात ही इमारत उभी केली. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असून इमारतीचे कामही तकलादू केल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असे आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

भूकंप झाला समजून बाहेर आल्यामुळे वाचला जीव – प्रत्यक्षदर्शी


इमारत कोसळण्याच्या सुमारास मी घराबाहेर होतो. घरी असलेल्या माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले, की भूकंप होतो आहे. मी त्याला भूकंप होत नसल्याचे सांगत होतो. तरीही आपल्या बोलण्यावर कायम राहत तो आपल्या आईला सोबत घेत इमारतीबाहेर आला. त्यानंतर केवळ काही क्षणांमध्येच संपूर्ण इमारत कोसळली, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

तातडीने खाली आल्याने बचावलो; जावेद चिंचकरने सांगितला प्रसंग

सायंकाळी व्यायाम करून आल्यानंतर मी किचनमध्ये काही खाण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी फ्रिज काहीसा खाली गेल्याचे दिसले. म्हणून मी कुटुंबाला सोबत घेऊन पाचव्या मजल्यावरून ओरडत सगळ्यांना घेऊन खाली आलो. तळमजल्यावर आल्यावर इमारतीचा पिलर तुटू लागला. तर काही सेकंदात दुसरा पिलर तुटण्यास सुरुवात झाली. तेव्हा आम्ही तातडीने सर्वजण दुसऱ्या इमारतीत पोहचलो. त्यानंतर काही क्षणात इमारत जमीनदोस्त झाली. काही सेंकदाचा फरक पडला नाहीतर आम्हीही त्यात अडकलो असतो, अशी प्रतिक्रिया जावेद चिंचकर या बचावलेल्या रहिवाशी तरुणाने दिली.

ढिगाऱ्याखालून ‘नाना’ अशी हाक मारत माझे नातू धावत येतील,  महंमद अली याना आशा

तारिक गार्डन इमारतीत महंमद अली यांची कन्या नौसिन  बांगी ही ए विंगमध्ये आपल्या तीन मुलासह आयशा बांगी (६), महंमद बांगी (४) रुकय्या बांगी (२) तिसऱ्या मजल्यावर राहत होती. सोमवारी २४ ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास तारिक गार्डन ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. ही माहिती नवशीन बांगी हिच्या भावाला कळल्यावर त्वरित त्याने आपले वडील महंमद अली यांना फोन करून मंडणगड पंदेरी येथून महाडला येण्यास सांगितले. महंमद अली हे सुद्धा नवशीन बांगी यांच्याकडे राहत होते. मात्र, लॉकडाऊन असल्याने ते मंडणगड पंदेरी येथे आपल्या गावी राहत होते. दुर्घटनेची माहिती कळताच महंमद अली हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच समोरचे दृश्य पाहून अली हे थबकले. ढिगाऱ्याखालून ‘नाना’ अशा हाका मारीत माझे नात, नातू धावत येतील, मुलगी आवाज देईल, अशा आशेवर अली हे डोळे लावून बसले होते.

महंमद अली यांची दोन नातवंन्दे सापडली पण मुलगी सोडून गेली
एनडीआरएफची पथके घटनास्थळी सोमवारी रात्री उशिरा दाखल झाली. त्यांनी तात्काळ शोध कार्याला सुरवात केली. मंगळवारी दुपारी  २ च्या सुमारास रुकय्या बांगी 2 वर्षाची मुलगी जखमी अवस्थेत सापडली तिचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत तिला बाहेर काढण्यात आले. मात्र काही वेळातच या आनंदावर विरजण पडले. तिची आई नौसिन नदीम बांगी मृत अवस्थेत मिळून आली. महंमद बांगी हा ४ वर्षीय मुलगाही जखम अवस्थेत सापडला.  महंमद अली यांना आपली एक नातं व एक नातू  मिळाल्याने थोडे समाधान वाटले मात्र त्यांचे हे समाधान मुलीचा मृतदेह पाहून क्षणात विरून गेले.

सरकारला स्ट्रक्चरल ऑडिट बाबत गांभीर्य नाही – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

महाडममधील घटनेची माहिती समजताच सोमवारी रात्री तातडीने  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आतापर्यंत शहरी भागात इमारत पडल्याच्या अनेक दुर्घटना घडत होत्या. पण, आता ग्रामीण भागातही अशा घटना घडू लागल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शहरासह ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारला याबाबत गांभीर्य नाही, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.आतातरी जुन्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करावे आणि नागरिकांचे जीव वाचवावे, अशी विनंतीही यानिमित्ताने दरेकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश- एकनाथ शिंदे

घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ सात ते आठ वर्षात इमारत कोसळली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता शिंदे यांनी वर्तवली. या इमारतीचा बांधकाम व्यावसायिक आणि ज्या अधिकाऱ्यांनी इमारत बांधकामाला परवानगी दिली, अशा सर्वांवर कारवाई केली जाईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

शासकीय मदतीसाठी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा – पालकमंत्री आदिती तटकरे

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच, या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, आणि जखमींना योग्य ती शासकीय मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटनास्थळावर शासकीय अधिकारी, पदाधिकारी, स्थानिक आणि यंत्रणेचे मदतकार्य

पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकरहे घटनास्थळावर तातडीने हजार झाले. त्यांनी तात्काळ सर्व यंत्रणा हलविली. मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती तातडीने नियुक्ती करण्यात आली. जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व  उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील  ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ याना सज्ज करण्यात आले. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल सज्ज करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन केले. म्हणता म्हणता १०० बॅग रक्त जमा झाले. प्रशासकीय पातळीवर तातडीने मदत पोचविण्यात आली. एनडीआरएफचे फाटक दाखल होईपर्यंत स्थानिकांनी मदत कार्याला सुरवात केली होती.

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट  https://twitter.com/PMOIndia/status/1298116244206313472?s=20

पंनरेंद्र मोदी यांनी दुः ख व्यक्त केले आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत असून जखमीच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. बचावकार्य सुरू असून शक्य ती सर्व मदत पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहमंत्री अमित शहांचे ट्वीट https://twitter.com/AmitShah/status/1297915713148125185?s=20

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित दुर्घटनेसंदर्भात ट्वीट केले आहे. रायगडमध्ये इमारत कोसळणे ही अत्यंत शोकांतिक घटना असल्याने त्यांनी म्हटले आहे. एनडीआरएफच्या महासंचालकांशी बोलून सर्व माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. शक्य ती सर्व मदत देण्यासाठी पथके वाटेवर आहेत आणि शक्य तितक्या लवकर बचाव कार्यात त्यांना मदत केली जाईल, असे ते म्हणाले. शाह यांनी प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्विट https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1298140462482522112?s=20

या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून जीवित हानी झाल्याची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक, बचाव आणि मदत कार्य करत आहेत.” असे त्यांनी म्हटले आहे.


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे ट्विट https://twitter.com/AshokChavanINC/status/1297960469295009792?s=20

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील महाड दुर्घटनेप्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत. महाडमधील इमारत कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप यांच्याकडून मी घटनेची माहिती घेतली. बचावकार्य वेगाने सुरू आहे. या मदतकार्याला यश मिळो व तेथील रहिवासी सुरक्षित रहावेत, ही प्रार्थना. असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here