कोरोना’ संकटामुळे कलिंगड शेतकरी चिंतेत, 400 टन माल पडून

0
194

 

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकरी वर्गाला. सद्यस्थितीत त्याचा मोठा परिणाम सिंधुदुर्गातील कलिंगड शेतकऱयांवर झाला आहे. शेतकऱयांनी अपार कष्ट करून तयार झालेला शेकडो टन कलिंगड माल शेतातच पडून आहे, तर काही कलिंगडे फुटून, सुकून नासाडी होत आहेत.

मालवण तालुक्यातील पेंडुर-खरारे येथील बऱयाच शेतकऱयांची मिळून सुमारे 400 टन कलिंगडे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे काही कलिंगडे खराब होत असून त्यांची शेतातच नासाडी होत आहे. त्यामुळे येथील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. पेंडुर खरारेमधील 35 ते 40 शेतकऱयांची 60 ते 70 एकर क्षेत्रातील कलिंगड शेती धोक्यात आली आहे. गेली काही वर्षे सातत्याने या गावातील काही शेतकरी वैयक्तिक, तर काही बचतगटांच्या माध्यमातून सामूहिक तत्त्वावर कलिंगड उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतात. स्थानिक बाजारपेठ व जिल्हय़ासह गोव्यातही त्यांना चांगली मागणी आहे.  ग्राहक नसल्याने दर्जेदार कलिंगडांची मागणी थांबली. आता तयार असलेली कलिंगडे 14 एप्रिलपर्यंत राहू शकणार नाहीत, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पेंडुर खरारेमध्ये कृषीरत्न बचतगटाची 60 टन, कृषीक्रांती बचतगटाची 40 टन, विठूमाऊली बचतगटाची 20 टन, संदेश नाईक-30 टन, विश्राम राणे-30 टन, अंकुश सावंत-15 टन, केशव घाडी-25 टन, सुरेश परब-15 टन, अनिल सावंत-10 टन, नाना सावंत-30 टन, विनोद सावंत-10 टन, उमेश सावंत-40 टन, संदीप सावंत-10 टन, प्रवीण सावंत 10 टन, सुभान सावंत, विश्वनाथ सरमळकर, सत्यविजय सावंत, अनिल चव्हाण यांची एकत्रित 35 टन यांच्यासह प्रसाद म्हापणकर, राजेंद्र घाडी, संजय पेंडुरकर, नितीन सावंत, गजानन परशुराम सावंत, निकेत सावंत, सीताराम सावंत, बाबूराव सावंत, कमलाकर सावंत, गजानन वासुदेव सावंत, प्रकाश सावंत, शांताराम सावंत, सुनील परब, महेश राऊळ, महेश पेंडुरकर, भाऊ परब, गंगाधर राणे, प्रदीप सावंत, खेमजी परब, सुहास परब, भालचंद्र प्रभू, जयसिंग परब, उदय पेडणेकर आदी कलिंगड शेती केलेल्या शेतकऱयांचा सुमारे 400 टन तयार माल विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.

पाणीपुरवठय़ासाठी लागणारे साहित्य, खते, औषधे आदी लाखो रुपयांच्या साहित्यासाठी कर्ज काढून तसेच दागिने गहाण ठेवून पिकासाठी पैसे उभे केले आहेत. परंतु या संकटामुळे यावर्षी कलिंगड शेतकऱयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे होणारे लाखो रुपयांचे नुकसान कसे भरून काढायचे या चिंतेत शेतकरी असून शासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

कठीण काळातही सामाजिक बांधिलकी

या कठीण परिस्थितीतही तेथील शेतकरी प्रवीण सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या बागेतील 1 टन कलिंगडे अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रम व पणदूर येथील संविता आश्रममध्ये द्यायचे ठरविले. यासाठी त्यांनी हेल्प फाऊंडेशन संस्था कोकण विभाग अध्यक्ष हितेंद्र काळसेकर व शिवप्रेमी ग्रुप सिंधुदुर्ग यांना मदतीचे आवाहन करून त्यांच्या सहकार्याने दोन्ही आश्रमांत मोफत कलिंगड वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here