कॅबिनेटमध्ये चव्हाण-भुजबळ यांच्यात ‘खुर्ची’चा वाद?

0
157

 

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सगळ्या मोठ्या नेत्यांना पदांच्या ‘खुर्च्या’ मिळाल्या. मात्र या मिळालेल्या बसायच्या खुर्च्यांची क्रमवारी कशी यावरूनही रुसवे फुगवे सुरू आहेत! मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनंतर कोण ज्येष्ठ व कुणाची खुर्ची मुख्यमंत्र्यांजवळ यावरून आता मंत्रिमंडळ बैठकीत वाद होऊ लागले आहेत. मंगळवारी ‘माजी मुख्यमंत्री’ अशोक चव्हाण व ‘माजी उपमुख्यमंत्री’ छगन भुजबळ यांच्यात खुर्चीच्या जागेवरून शाब्दीक चकमक रंगल्याचे समजते.…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मंत्री आहेत. त्यामुळे या दिग्गज नेत्यांचा राजशिष्टाचार संभाळताना राज्याच्या राजशिष्टाचार खात्याची तारांबळ उडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यालगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची मंत्रिमंडळ बैठकीत असते. तसा राजशिष्टाचार आहे. परंतु या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे दिग्गज नेतेही आहेत. यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूच्या खुर्चीवर छगन भजबळ हे बसले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले. ‘मी माजी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे राजशिष्टाचारानुसार ही माझी खुर्ची आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यावर मीही माजी उपमुख्यमंत्री आहे, मलाही राजशिष्टाचार आहे, असे छगन भुजबळ यांनी चव्हाण यांना उद्देशून सांगितले. त्यावर माजी मुख्यमंत्री म्हणून माझी ही खुर्ची आहे, असे चव्हाण यांनी पुन्हा सांगितले. त्यानंतर भुजबळ त्या खुर्चीवरून उठून बाजूच्या खुर्चीवर बसले.

…राज्य मंत्रिमंडळातील अन्य नवे जुने सहकारी मंत्री चव्हाण व भुजबळ यांच्यातील वाद बघत होते…. माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष, मंत्रिपदे भूषविणारे नेते या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे भविष्यात राजशिष्टाचारावरून असे वाद होताना दिसतील, यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न आहे, असे राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या खुर्च्याही शिष्टाचारानुसार ठेवण्यात आलेल्या नसल्याचेही समजते. किंबहुना त्यामुळेही अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची ज्येष्ठता डावलून त्यांना मागे बसावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here