अज्ञात आजाराने आणखी एका खलाशाचा मृत्यू

0
114

देवगड बंदरातील बोटींवर खलाशांना एका विशिष्ट आजाराने ग्रासले असून मंगळवारी आणखी एका खलाशाचा या आजाराने ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत या विशिष्ट आजाराने तीन खलाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनही आरोग्य विभागाला या रोगाचे निदान करता आलेले नाही. बाबानो पन्दान नेती (30, रा, ओरिसा) असे मृत झालेल्या खलाशाचे नाव आहे. देवगड येथील सौ. पल्लवी प्रवीण कांदळगावकर यांच्या ‘पल्लवी’ या बोटीवर हा खलाशी कामाला होता.

सौ. कांदळगावकर यांच्या बोटीवर या खलाशाची सोमवारी प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला तातडीने ओरोस येथे उपचारासाठी नेण्यात आले. ओरोस येथे उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे मृतदेह त्यांच्या गावी पाठविणे शक्य नसल्याने देवगड येथेच त्याच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले.

कोल्हापूरात दाखल केलेले पाच जण बरे झाले

दरम्यान, कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविलेल्या पाच गंभीर खलाशांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. देवगड बंदरातील सुमारे 16 खलाशांना एका विशिष्ट रोगाची लागण झाली आहे. यामध्ये खलाशांचे ढोपराच्या खाली पायांना सूज येऊन त्यांना उभं राहता येत नाही. या आजाराचे सात खलाशी ओरोस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सुरुवातीला दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर उर्वरित पाच खलाशांना ओरोसहून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तेथून कोल्हापूर येथील अष्टर आधार या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

कोल्हापुरात उपचारासाठीचा खर्च लाखावर

कोल्हापूर सीपीआर रुग्णालयातून या खलांशांना खासगी रुग्णालयात उपचार केल्यामुळे सुमारे लाखो रुपयांचा उपचाराचा खर्च बोटीच्या मालकांना सोसावा लागणार आहे. खलाशांना खासगी रुग्णालयात उपचाराचा निर्णय कोल्हापूर सीपीआरने बोट मालकांशी कोणतीही चर्चा न करता घेतल्याने बोटमालक अडचणीत आले आहेत. देवगड बंदरातील खलाशांच्या या विशिष्ट आजाराचा आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हे करण्यात आला. सुमारे 810 खलाशांची तपासणी  केली. त्यातील 16 खलाशांना हा आजार झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाकडून निदान नाही

या आजारावर जिल्हा रुग्णालयाकडून कोणतेही निदान करण्यात आलेले नाही. या खलाशांचे धान्यही तपासणीसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही प्रशासनाने काहीही अहवाल दिलेला नाही. कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात या रुग्णांवर तपासणी झाली. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here