सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार घरोघरी व्याधीग्रस्तांचा सर्व्हे

0
137

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील गंभीर व्याधीग्रस्तांचा सर्व्हे करण्याचा आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेला दिला. राज्य शासनाने लॉकडाउनचे बहुतांश निर्बंध उठविले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हे करावा, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, कर्करोग व इतर गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेने यादी तयार करावी. त्यांच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आणि इतर रोग लक्षणांबाबत तपासण्या करून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात यावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी इमारतीच्या विविध विभागांची पाहणी केली. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, शाखा अभियंता व्ही. व्ही. जोशी, तसेच आरोग्य विभागाचे डॉक्‍टर व अधिकारी उपस्थित होते.

या वेळी त्या म्हणाल्या, “”कोरोना साथ रोगामुळे रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्रास होऊ नये, तसेच त्यांच्यावर उपचार करण्याच्या सुविधा परिपूर्ण असाव्यात, यासाठी यंत्रणा सज्ज असणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील गळती बांधकाम विभागाने तातडीने रोखावी.”

के. मंजूलक्ष्मी यांनी आदेश दिले, की जिल्हा रुग्णालयातील स्वॅब चाचण्यांबाबत तातडीने समन्वय अधिकारी नेमावा, रोज सुमारे 250 चाचण्या होत आहेत. आरटीपीसीआर चाचण्या 150 व अँटिजेन टेस्टद्वारे सुमारे 100 चाचण्या होत आहेत. बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुरेसा पौष्टिक आहार देण्यावरही भर द्यावा. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आरोग्य यंत्रणेने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया गतीने राबवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here