21.4 C
Panjim
Wednesday, January 26, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 हजार बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक मदत जिल्हा कामगार कल्याण अधिकारी यांची माहिती

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 हजार 434 नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा कामगार कल्याण अधिकारी टेंबुलकर यांनी दिली.

जगभरात आज कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. भारतातही या विषाणूने प्रवेश केला आहे. या विषाणूपासून बचावासाठी विविध देश लॉकडाऊनसारखा पर्याय निवडत आहेत. आपणही लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने 24 मार्च 2020 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला. सुरुवातीस हा लॉकडाऊन 14 एप्रिल 2020 पर्यंतच होता, त्यानंतर त्यामध्ये वाढ करुन सध्या 3 मे 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आला आहे.
या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसला आहेत तो मजूर व कामगार वर्गाला. राज्य शासनाने वेळीच पावले उचलत परराज्यातील मजूर, बेघर व कामगार यांच्यासाठी कॅम्प उभारून त्यांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था केली आहे. पण, बांधकाम क्षेत्रात काम करणारे स्थानिक मजूर यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. काम नसल्यामुळे मजुरी नाही. पैसा नसल्यामुळे घरात वाण सामान कसे भरावयाचे याची भ्रांत या बांधकाम कामगारांना पडली होती. हातावर पोट असणाऱ्या या वर्गाची काळजी घेण्यास सरकार खंबीर असल्याचे शासनाने दाखवून दिले आहे. यासाठीच नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सर्व प्रकराची बांधकामाची कामे बंद आहेत. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासर्वांचा विचार करुन शासनाने या कामगारांना अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक नोंदणीकृत सक्रिय कामगारांच्या बँक खात्यावर थेट अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांची यादी त्यांच्या बँक खात्याच्या तपशीलासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 25 हजार 434 बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर जिल्हा कार्यालयाकडून आतापर्यंत 13 हजार 937 बांधकाम कामगारांची यादी त्यांच्या बँक खात्याच्या तपशीलासह मुंबई येथे पाठविण्यात आली आहे. तसेच या कामगारांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवातही झाली असल्याचे जिल्हा कामगार कल्याण अधिकारी यांनी सांगितले आहे.
सध्याच्या या अडचणीच्या काळात सर्वच क्षेत्रातील कामगारांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. आशा या परिस्थितीमध्ये बांधकाम कामगारांसाठी शासानाने देऊ केलेली ही मदत नक्कीच दिलासादायक आहे. जिल्ह्यातील 25 हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -