सिंधुदुर्ग – जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 51 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. को वॅक्सिन आणि कोविशील्ड लसीचे लसीकरण जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 51 ठिकाणी लसीकरणची सुविधा
लसीकरणला वेग येण्यासाठी आता ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. सर्व ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये मिळून 44 सरकारी रुग्णालयात आणि सात खासगी रुग्णालये मिळून 51 ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. को वॅक्सिन ही लस जिल्हा रुग्णालयात दिली जाते आणि कोविशील्ड ही लस जिल्ह्यातील अन्य केंद्रांवर दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
आता 38 प्राथमिक केंद्रातही लसीकरण सुरू
कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आल्यानंतर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिह्यातही कोरोना लसीकरणाला प्रारंभ होऊन सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, अधिकारी, डॉक्टरांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर शासनाने 60 वर्षावरील वयोवृद्ध आणि 45 वर्ष ते 59 वर्षे वयोगटातील व्याधीग्रस्त लोकांना लस द्यायला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला केवळ जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातच लस दिली जात होती. मात्र, आता ग्रामीण रुग्णालय, जिह्यातील सात खासगी रुग्णालय आणि 38 प्राथमिक केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाला वेग येऊ लागला आहे. दरम्यान लसीकरण करून घेतले म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी गाफील राहू नये. योग्य ती काळजी घ्यावी. असे सांगताना ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी कालबद्ध वेळेत दुसरा डोस घ्यावा. ज्यांनी अद्यापही लसीकरण करून घेतलेले नाही, त्यांनीही लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी केले आहे.
जिल्ह्यातल्या सात खासगी रुग्णालयात सुविधा
खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यात जिल्ह्यात ज्या रुग्णालयांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजनेत नोंद आहे, अशा रुग्णालयांमध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. सिंधुदुर्गात अशी सात रुग्णालये आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यात नागवेकर हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल व साईलीला हॉस्पिटल, नाटळ, तर कुडाळ तालुक्यात एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पडवे तसेच सुयश हॉस्पिटल, कुडाळ त्याचबरोबर सावंतवाडी शहरातील खानोलकर हॉस्पिटल या सात ठिकाणी लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असलेले कक्ष तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात येत असून यासाठी आवश्यक ती लस उपलब्ध आहे.