सिंधुदुर्गात 27 हजार 859 नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, चार हजार 512 जणांनी घेतला दुसरा डोस जिह्यात 51 ठिकाणांसह सर्व आरोग्य केंद्रात लसीकरण

0
183

सिंधुदुर्ग – जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता वेग येऊ लागला असून जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 859 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 5 हजार 832 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सद्यस्थितीत 4 हजार 512 लसी शिल्लक असून आणखी 20 हजार लसींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आता जिल्हा रुग्णालयसह 51 ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून जिह्यातील सर्व 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लसीकरणाची सुविधा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

आता 38 प्राथमिक केंद्रातही लसीकरण सुरू

कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आल्यानंतर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिह्यातही कोरोना लसीकरणाला प्रारंभ होऊन सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, अधिकारी, डॉक्टरांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर शासनाने 60 वर्षावरील वयोवृद्ध आणि 45 वर्ष ते 59 वर्षे वयोगटातील व्याधीग्रस्त लोकांना लस द्यायला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला केवळ जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातच लस दिली जात होती. मात्र, आता ग्रामीण रुग्णालय, जिह्यातील सात खासगी रुग्णालय आणि 38 प्राथमिक केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाला वेग येऊ लागला आहे.

कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा अशा दोन प्रकारच्या लस उपलब्ध

सिंधुदुर्गात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा अशा दोन प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या. आतापर्यंत जिह्याला 37 हजार 960 कोरोना प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 33 हजार 448 लसीकरण झाले. यामध्ये 27 हजार 859 नागरिकांना पहिला डोस तर पाच हजार 832 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या 37 हजार 960 लसींपैकी 33 हजार 448 लसी नागरिकांना दिल्यामुळे आता फक्त चार हजार 512 लसी शिल्लक आहेत. आणखी 20 हजार लसींची मागणी केली असून ती एक दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाला आणखी वेग येणार आहे

जिल्ह्यात 51 ठिकाणी लसीकरणची सुविधा

लसीकरणला वेग येण्यासाठी आता ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. सर्व ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये मिळून 44 सरकारी रुग्णालयात आणि सात खासगी रुग्णालये मिळून 51 ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे.

जिल्ह्यातल्या सात खासगी रुग्णालयात सुविधा

खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यात जिल्ह्यात ज्या रुग्णालयांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजनेत नोंद आहे, अशा रुग्णालयांमध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. सिंधुदुर्गात अशी सात रुग्णालये आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यात नागवेकर हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल व साईलीला हॉस्पिटल, नाटळ, तर कुडाळ तालुक्यात एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पडवे तसेच सुयश हॉस्पिटल, कुडाळ त्याचबरोबर सावंतवाडी शहरातील खानोलकर हॉस्पिटल या सात ठिकाणी लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असलेले कक्ष तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात येत असून यासाठी आवश्यक ती लस उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here