सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथे बाजारपेठेत पाणी भरले आहे . दोडामार्गमध्ये पुराच्या पाण्यात मालवाहक गाडी फसली आहे.
वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा घसरल्याने रस्त्याचा भाग खचला आहे. सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे घाटात दरड कोसळण्याची देखील दाट शक्यता आहे.
सध्या रस्त्याचा भाग खचल्याने करूळ घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव आपल्या सहकार्यांसह करुळ घाटातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
खारेपाटण येथे शुकनदीचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरून खारेपाटण शहरात येणारा मुख्य रस्ता खारेपाटण हायस्कुल रोड ते खारेपाटण बसस्थानक रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. तर खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्णताह बुडाला आहे.
कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सोमवारी दुपारी २.३० वाजता खारेपाटण गावाला तातडीची भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कणकवली तालुका पोलिस निरीक्षक अजमुदिन मुल्ला, कणकवली तालुका प्रभारी नायब तहसीलदार सुजाता पाटील उपस्थित होत्या
दोडामार्ग तालुक्यातील भेडशीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप चालकाची गाडी येथील नदीला आलेल्या पाण्यात अडकली. पाणी गाडीच्या बॉनेट पर्यंत गेल्याने गाडी पाण्यातच अडकून पडली आहे. ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून केला जात होता.