सिंधुदुर्गात पूरस्थिती, सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

0
113

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. देवगड तालुक्यात अति वृष्टीमुळे एक घर कोसळले आहे. तर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. तर नाद गावामध्येही तीन घरांचे छप्पर उडाले.

गगनबावडा घाट मार्ग कोकण व घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर करूळ घाट आहे. परंतु तो घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक गेली दहा दिवस बंद आहे.

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत गगनबावडा तालुक्यातील मांडुकली व खोकुर्ले गावात मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग बंद झाला आहे.

कुडाळ मधून वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला आहे. यामुळे पावशी गावातील शेकडो एकर शेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. कुडाळ मध्ये देखील किनारी भागात पाणी शिरले आहे. कुडाळ तालुक्यातील पीठढवळ नदीलाही पूर आला आहे.

या दोन्ही नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात या नद्यांचे पाणी पात्राबाहेर आलेले आहे. त्यामुळे किनारी भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कणकवली तालुक्यातही पूर आला आहे. शिवगंगा नदीच्या पुराचे पाणी लोरे येथील पुलावरून वाहत आहे त्यामुळे फोंडा वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर गडनदीला पूर आल्याने कणकवलीतुन कासरलकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

तालुक्यातील भरणी गावालाही पुराचा फटका बसला आहे. येथील नदीला पूर आल्याने या भागातील शेतीत पाणी घुसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here