सिंधुदुर्गात पाऊस, भंगसाळ, तेरेखोल नदीला पूर

0
281

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अनेक ठीकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कुडाळ मधील भंगसाळ नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे कुडाळ रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर कुडाळ पंचायत समिती कडील शहराकडे जाणारा रस्ता देखाल पाण्याखाली गेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने विश्रान्ती घेतली होती. मात्र गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असून डोंगरी भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कुडाळ येथील भंगसाळ नदीला पूर आला असून कुडाळ शहरातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील समुद्री भागातही उधाणाचा फटका बसला आहे. देवगड मधील दहीबाव समुद्र किनारी लाटांचा तडाखा बसत असून आधीच या ठिकाणी किनारी भाग खचला असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर व परिसराला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीने गेल्या दहा दिवसांत पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदीचे पाणी आज सकाळीच शहरातील आळवाडी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पाण्याची पातळी वाढत असल्याने ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास प्रारंभ केला आहे. पावसाचा जोर आज सकाळी देखील कायम आहे. हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने स्थानिक प्रशासन देखील सतर्क झाले आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील आळवाडी बाजारपेठेत दुसऱ्यांदा तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. आळवाडी येथील कित्येक दुकाने आज सकाळीच पाण्याखाली गेली आहेत. पुराचे पाणी वाढत असल्याने बांदा सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, प्रसाद चिंदरकर, सुनील धामापूरकर यांनी याठिकाणी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सरपंच खान यांनी सूचना दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here