सिंधुदुर्गात गणेश चतुर्थीसाठी तीन लाख चाकरमानी दाखल आणखी दीड ते दोन लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्‍यता

0
104

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गणपती सणासाठी तब्बल 3 लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. गतवर्षी कोरोनाचे संकट मोठे असल्याने अनेकांना गावचा गणपती चुकला होता. मात्र यावर्षी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

आणखी दीड ते दोन लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्‍यता

रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाची अपूर्ण कामे, ठिकठिकाणचे खड्डे, धुवाँधार पाऊस, महागलेले पेट्रोल-डिझेल आदी विघ्नांवर मात करत राज्यभरातून सुमारे तीन लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी दीड ते दोन लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्‍यता आहे. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्‍याने मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत. दरम्‍यान, नियमित आणि गणेशोत्‍सव विशेष गाड्या देखील फुल्‍ल आहेत. कोकण रेल्‍वेच्या एकेरी मार्गावर वाहतुकीचा ताण असल्‍याने सर्वच रेल्‍वे गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत.

मुंबईतून एस.टी.च्या ९० हून अधिक बस जिल्ह्याच्या विविध आगारात दाखल

सिंधुदुर्गातील चौपदरीकरण पूर्ण झाल्‍याने चाकरमान्यांचा खारेपाटण ते बांद्यापर्यंतचा प्रवास सुसाट झाला आहे. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे चाकरमानी जिल्ह्यात फिरकले नव्हते. यंदा मात्र दुप्पट उत्‍साहाने चाकरमानी रेल्‍वे, खासगी बस आणि आपापल्‍या वाहनांतून जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली आहे. गतवर्षी कोरोनामुळे रेल्‍वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्‍वे मार्गावर तब्‍बल २२४ गणेशोत्‍सव विशेष गाड्या सोडण्यात आल्‍या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्‍ल झाले. या विशेष गाड्या तीन सप्टेंबरपासून जिल्ह्यात येत आहेत. मुंबईतून एस.टी.च्या ९० हून अधिक बस जिल्ह्याच्या विविध आगारात दाखल झाल्‍या. आज रात्री आणि उद्या सायंकाळपर्यंत आणखी बस जिल्ह्यात येणार असल्‍याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

चाकरमान्यांनी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गाला दिली पसंती

जिल्ह्यात खासगी वाहनाने देखील सहकुटुंब चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यात रायगड, रत्‍नागिरीतील मार्ग खड्डेमय असल्‍याने अनेक चाकरमान्यांनी मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गाला पसंती दिली आहे. यंदा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्‍याने कुठेही फारशी वाहतूक कोंडी झालेली नाही. यंदा जुलैमध्ये अतिवृष्‍टीसदृश पाऊस झाला. त्‍यानंतर ऐन गणेशोत्‍सवाच्या तोंडावर मुसळधार सरी कोसळत आहेत; मात्र या विघ्नांची पर्वा न करता जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. फटाके आणि शोभेच्या वस्तू, किराणा दुकाने, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक्‍स तसेच फिरते फळ, भाजी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होत असून जिल्ह्यातील बाजारपेठांत कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

कोकण रेल्वेच्या सेवेलाच अधिक पसंती

कोकण रेल्वेमार्गावर २२४ विशेष गाड्या सोडण्यात आल्‍या आहेत. आत्तापर्यंत ८४ विशेष गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्‍या आहेत. जुलैमधील अतिवृष्‍टी तसेच गेले चार दिवस मुसळधार पाऊस होत असला तरी रेल्वेमार्ग निर्धोक असल्याने चाकरमान्यांनी कोकण रेल्वेच्या सेवेलाच अधिक पसंती दिली आहे. दरम्‍यान, गणेशोत्‍सवात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी एस.टी. प्रशासनाने दोनशेहून अधिक गाड्या सज्‍ज ठेवल्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here