शेततळ्यावर अंगावर वीज पडून बाप-लेकाचा मृत्यू;  अलिबाग जवळ पेझारी दिवलांग येथील घटना

0
5692

 

कोंकण (प्रतिनिधी) – कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पडझडीच्या घटना घडल्या आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी जवळ दरड कोसळली आहे. रायगड जिल्ह्यात दुर्दैवाने वीज पडल्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने कोकणात दाणादाण उडवली आहे.

मागील दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात विचित्र वातावरण बघायला मिळत आहे. दिवसभर उन तर रात्री वादळी पाऊस सुरु आहे. शनिवारच्या रात्री मेघगर्जनेसह पावसाने जिल्ह्याला झोडापून काढले आहे.जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग जवळ वीज पडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषिकेश रघुनाथ म्हात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू  झाला आहे.

अलिबाग तालुक्यातील पेझारी-दिवलांग गावातील बाप लेक हे जवळच्या शेतातील तळ्यावर गेले होते. तिथे त्यांच्यावर वीज कोसळून दोघांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे दोघेही अत्यवस्थ झाले होते. गावकऱ्यांच्या मदतीने बाप-लेकाला उपचारासाठी तात्काळ रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नेण्यात आले.  मात्र रुग्णालयात पोचल्यावर रघुनाथ म्हात्रे वयवर्षे 55 यांना मृत घोषित केले. तर मुलगा ऋषिकेश म्हात्रे वयवर्षे 25 याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्याचीही प्राणज्योत मालवली. निसर्ग चक्रापुढे एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने म्हात्रे कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे तर संपूर्ण पेझारी – दिवलांग गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी अलिबाग येथील महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here