सिंधुदुर्ग – व्हेल माशाची उलटी वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोव्यातील तिघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून तब्बल पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज बांदा गांधी चौक येथे करण्यात आली. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलोसांची धाडसी कारवाई
या प्रकरणी काँन्टनटिनो फीलोमीनो फर्नाडिस (सालशेत-मडगाव), जुजू जोस फेरीस (सालशेत-मडगाव) व तनिष उदय राऊत (१८, तोरसे, लंगरबाग) यांना ताब्यात घेण्यात आले गुप्त माहीतीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बांद्यात सापळा रचून ही धाडसी कारवाई केली. संरक्षित प्राणी, व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) या बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या इसमांचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला. व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने असे मानले जाते. सदरचा पदार्थ हा स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. नमुद पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफ्युम, औषधांमध्ये तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी देखील केला जातो. सदर पदार्थाची खरेदी विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. नमुद पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये करोडो रुपयांमध्ये किंमत आहे.
दोन वाहने घेतली ताब्यात
वन्य संरक्षित प्राणी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विकण्याकरीता बांदा परिसरात येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार बांदा गांधी चौक येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातील तीन संशयितांकडून व्हेल मासा उलटी सह स्विफ्ट कार (जीए ०८ एम ५०५५) व मोटर सायकल (जीए ०३ ०५४९) ताब्यात घेतली. सदर संशयित एका पिशवीमधून ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी ज्याची किंमत साधारणतः ५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल
संबंधित कारवाईनुसार तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्रा दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, हेड काँस्टेबल अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, पोलीस काँस्टेबल ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रथमेश गावडे यांनी केली.