आंगणेवाडीतील भराडी मातेची यात्रा २४ फेब्रुवारीला

0
181

 

सिंधुदुर्ग – दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेची तारीख कधी ठरते याबद्दल दरवर्षी सर्वांनाच उत्सुकता असते. धार्मिक रीतीरिवाजानुसार यात्रेची तारीख ठरविण्याचे विधी संपन्न झाल्यावर आज सकाळी आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ यांच्याकडून यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. ही यात्रा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

सध्या श्री देवी भराडी मातेच्या मंदिरात ६ डिसेंबर २०२१ पासून म्हणजेच देव दिवाळीच्या दुसर्‍या दिवसापासून ते श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक उत्सवात देवीची प्रथम ओटी भरेपर्यंत देवीची ओटी भरणे, गोड पदार्थ ठेवणे, नवस फेडणे आदी विधी व कार्ये बंद ठेवण्यात आली आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा केवळ आंगणे कुटुंबीय यांच्यापुरती मर्यादित ठेवून पार पडली होती. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या यात्रेचे स्वरूप कसे असेल याबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी नव्या व्हेरिएंटमुळे काहीशी धास्ती आहे. भराडी मातेने कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे आणि भक्तांना या महाउत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी असेच साकडे भाविक देवीकडे घालत आहेत.

त्यामुळे यात्रेत भाविकांना देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here