रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे वाढत्या वयोमानामुळं लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत; नीलेश राणे यांची माहिती

0
95

सिंधुदुर्ग – केंद्र शासनाच्या मायक्रो स्मॉल अँड मीडियम विभागामार्फत (एमएसएमई) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीत ३ दिवसीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रातील ८० अधिकारी रत्नागिरीत माहिती देण्यासाठी येतील. यातून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती भाजपाचे युवा नेते माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) दिली. एकूण मतांचा विचार करता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Constituency) भाजपचाच (BJP) दावा आहे. मी या निवडणुकीसाठी इच्छुक नाही आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील वयोमानानुसार निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा राणे यांनी केला.शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या मध्यम, लघु, सूक्ष्म उद्योग विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केल्याने ते गावागावांत पोहोचले.विश्वासार्ह योजना म्हणून प्रदर्शनाचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे राहिले. अशाच प्रकारचे प्रदर्शन रत्नागिरी जिल्ह्यातही भरवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार १ ते १० फेब्रुवारीदरम्यान रत्नागिरीत प्रदर्शन भरवले जाणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उभारले जाणार आहेत. एमएसएमईमार्फत सादरीकरण केले जाणार आहे. कर्जाऐवजी सुविधा देणे हाच प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.’केंद्र शासन या प्रदर्शनाद्वारे थेट जनतेच्या दारात जाणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीसंदर्भात राणे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणीचा सर्वांनाच अधिकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. नारायण राणे (Narayan Rane) हे वाढत्या वयोमानामुळे लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत. मला लोकसभेची निवडणूक लढवण्यात कोणतेही स्वारस्य नाही. भाजपचा कमळ निशाणीवरील अधिकृत उमेदवार लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होणार आहे. महायुती म्हणून कधी दोन पावले मागे, दोन पावले पुढे जाण्यात सर्वांचे भले आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चितच प्रयत्न करतील, असा आशावाद राणे यांनी व्यक्त केला.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here