मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन वेगमर्यादा आणि बेदरकार वाहनांवर कारवाईसाठी तैनात केलेली ‘इंटरसेप्टर’ वाहने यांमुळे गेल्या दीड महिन्यात १२ हजार ३६३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांत ९० टक्के वाहनांचा वेग प्रतितास १०० किमीपेक्षाही अधिक राहिला आहे. तर अन्य प्रकरणांत घाटक्षेत्रात प्रतितास ५० किमीची वेगमर्यादा वाहनचालकांनी ओलांडली आहे.
भरधाव वाहन चालवून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्यातील वाहनांच्या वेगावर नव्याने मर्यादा आणण्यात आली आहे. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी १८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्यातील द्रुतगती मार्गासह, चार मार्गिका रस्ते, महापालिका हद्दीतील रस्त्यावर करण्यात आली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर आठपेक्षा कमी प्रवासी आसन वाहनांसाठी असलेली वेगमर्यादा प्रतितास १०० पर्यंत नेण्यात आली. त्याआधी ती प्रतितास ८० किलोमीटर एवढी होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाटक्षेत्रातील वेगमर्यादा प्रतितास ५० किलोमीटपर्यंत आहे. या वेगमर्यादेबरोबरच बेदरकार वाहनांवर कारवाईसाठी द्रुतगतीवर पळस्पे, बोरघाट, खंडाळा, उरसे या ठिकाणी प्रत्येकी एक ‘इंटरसेप्टर’ वाहन तैनात आहे. ‘लेझर’ तंत्रज्ञानावर आधारित ‘स्पीडगन’, ई-चलान यंत्रणा, मद्यपींवर कारवाईसाठी ‘ब्रेथ अॅनलायझर’ही आहेत.
वर्षभरात ३४ हजार लायसन्स निलंबित
वाहनचालकांकडून वाहतूक नियम न पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. एका चालकाकडून तीन वेळा गुन्हा केल्यानंतर ‘आरटीओ’कडून चालकाचे लायसन्स (अनुज्ञप्ती) निलंबित केले जाते. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये राज्यात ३४ हजार लायसन्स निलंबित केल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली.
सिग्नल लाल असतानाही वाहन चालवणे, वाहन वेगाने चालवणे, ओव्हरलोड वाहन चालवणे, मालवाहतूक वाहनांमधून प्रवासी घेऊन जाणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे अशा गुन्ह्य़ांमध्ये लायसन्स निलंबित केले आहे. २०१८ मध्ये २८ हजार ५४७ वाहनचालकांचे लायसन्स निलंबित केले होते.
१ कोटी २३ लाख दंड वसूल
नवीन वेगमर्यादा आणि इंटरसेप्टर वाहनांमुळे बेदरकार वाहनांवरील कारवाईत १९ नोव्हेंबर २०१९ ते ५ जानेवारी २०२० पर्यंत वाढ झाली आहे. या कालावधीत १२ हजार ३६३ प्रकरणांत वाहनांचा बेदरकारपणा आढळला असून त्यांच्यावर केलेल्या कारवाईत १ कोटी २३ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर जानेवारी २०१९ ते १८ जानेवारीपर्यंत द्रुतगती मार्गावरील कारवाई पाहता ६ हजार २७९ वाहनांवर कारवाई करताना ४५ लाख रुपये दंड वसूल केल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कारवाईत दुप्पटीने वाढ झाली आहे. दीड महिन्यात झालेल्या कारवाईत ९० टक्के वाहनांचा वेग प्रतितास १०० पेक्षा जास्त आढळला. घाटक्षेत्रात वाहनांसाठी प्रतितास ५० किलोमीटरची वेगमर्यादा असून उर्वरित प्रकरणे घाटक्षेत्रातील असल्याचे सांगितले.
नवीन वेगमर्यादा आणि इंटरसेप्टर वाहनावरील लेझरयुक्त स्पीडगनमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेदरकार वाहनांवरील कारवाई वाढली आहे. सध्या चार इंटरसेप्टर वाहने असून त्यामुळे कारवाई करणे सोपे जात आहे.
– दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक (ठाणे परिक्षेत्र-वाहतूक)