तिवरे धरणफुटीनंतर आठ महिन्याने धरणाच्या पुनर्बांधणीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मातीच्या धरणाला प्रखर विरोध दर्शवताना काँकीटचे तेही पूर्णपणे नवे धरण बांधावे असा एकमुखी ठराव तिवरेवासीयांनी ग्रामसभेत घेतला आहे.
2 जुलैच्या रात्री मुसळधार पावसात 28 लाख घनमीटर पूर्ण पाण्याने भरलेले तिवरे धरण फुटले आणि क्षणांतच होत्याच नव्हते झाले. यामध्ये प्रचंड मनुष्य व वित्तहानी झाली. शासनाने मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली असली तरी पुनर्वसनासह अन्य प्रश्न कायम आहेत. अशातच आता धरण पुनर्बांधणीची चर्चा सुरू झाली असून आमदार शेखर निकम यांनी धरण बांधणीसाठी नऊ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले आहे.
मातीचे हे धरण मधोमध फुटले होते. त्यातच अतिवृष्टीत धरणाचा डोंगराकडील भागात पडलेल्या भेगांमुळे उर्वरीत भागही धोकादायक बनला आहे. त्यामुळे फुटलेल्या धरणाच्या मध्यापासून भेगा गेलेल्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत धरण बांधण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यासाठी प्राथमिक 9 कोटीच्या खर्चाला मान्यता दिली असल्याचे पुढे येत आहे.
दरम्यान, मातीचे धरण फुटल्याने पुन्हा मातीचे धरण बांधू नये या मतावर ग्रामस्थ ठाम आहेत. मातीचे धरण बांधून पुन्हा भितीच्या छायेत ग्रामस्थांना रहायचे नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दुरूस्तीत फुटलेल्या धरणाचा अर्धाभाग जोडू नये. त्यापेक्षा पुर्णपणे कॉक्रीटचे धरण बांधले जावे. शिवाय सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र हे धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्याने याचाही मातीचे धरण बांधताना विचार होणे गरजेचे आहे. यासंदर्भात ग्रामसभेत करण्यात आलेल्या ठरावाला सूचक म्हणून मंगेश शिंदे तर सूचय शिंदे यानी अनुमोदन दिले आहे. याबाबत आमदार, खासदार, मंत्री यांच्यास्तरावर पाठपुरावाही केला जाणार आहे.