महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू झाली आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. दरम्यान, मित्रपक्षांमध्ये आता एकवाक्यता ठेवणार असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. आमदारांच्या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातच अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम यांनी संजय राऊत यांची लीलावती रूग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर हे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी थेट ट्रायडेंट हॉटेलवर पोहोचले. दरम्यान, सध्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे. किमान समान कार्यक्रमावर या बैठकीत चर्चा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेला पुन्हा एकदा वेग
