नाशिक पंचवटी पोलीस ठाण्यात चक्क आमदार हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कळवणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार हरवल्याची तक्रार त्यांचा मुलगा ऋषिकेश पवार यांनी दाखल केली आहे. राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, अत्यंत नाट्यमय घडामोडींची सकाळ उजाडल्यानंतर शनिवारचा दिवस संपूर्णपणे राजकीय नाट्याचा ठरला. अजित पवार यांचा भाजपबरोबर सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय वैयक्तित होता, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांच्याबरोबर कोण आमदार याची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या आमदारांपैकी एकेक आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला आले, पण आमदार नितीन पवार समोर आले नाहीत.