27 C
Panjim
Friday, January 28, 2022

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी समतादिन कार्यक्रम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना जाहीर

Latest Hub Encounter

 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी समता दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे आणि विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बापुसाहेब भुजबळ म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या स्मृती दिवस समता दिन म्हणून पाळण्यात येतो. यंदाचा समतादिन कार्यक्रम गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी, सकाळी साडेनऊ (९.३०) वाजता, समता भूमी, महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले पेठ, पुणे येथे होणार आहे. समतादिन कार्यक्रमानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रूपये एक लाख (१,००,०००), मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुक्ता टिळक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी हा पुरस्कार प्रा. हरि नरके, उत्तम कांबळे, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, बाळकृष्ण रेणके, वीरप्पा मोईली, डॉ.भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरूंधती रॉय, खासदार शरद यादव, डॉ. मा. गो. माळी आणि शरद पवार यांना प्रदान करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फुले-शाहू- आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून येणाऱ्या समता ज्योतीचे स्वागत महात्मा फुले वाडा येथे केले जाणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे आणि विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -