कोकण – डोंगर माथ्यावर राहणारी एक मुलगी पाणी भरण्यासाठी जाते आणि आपला जीव गमावते, ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण हे वास्तव आहे. घटना आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातली.
आदिवासी बहुल भाग असलेल्या कर्जत तालुक्यात पळसदरी ठाकूरवाडी आहे.
गावात भीषण पाणीटंचाई आहे आणि हीच पाणीटंचाई आज एका चिमुरडीच्या जीवावर बेतलीय.
सारिका पिरकर ही १३ वर्षाची चिमुरडी घरात पाणी नव्हतं म्हणून पाणी भरण्यासाठी निघाली खरी पण घरी पोह्चलीच नाही.
वाडीत पाणी टंचाई असल्याने सारिका तिच्या घरापासून १ किलोमीटरवर असलेल्या रेल्वेच्या तलावाजवळ पाणी आण्यासाठी गेली होती. पाण्याचे हांडे घेऊन परतत असताना रस्ता ओलांडताना तिला भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने धडक दिली. धडकेत चारचाकी तिच्या अंगावरून गेली आणि सारिका रक्तबंबाळ झाली. जमावाने अपघात झालेल्या गाडीत घालूनच सारिकाला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे प्राथमिक उपचार करून तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सारिकाचा मृत्यू झाला.
सारिका तर गेली पण तिच्या मृत्यूने एका प्रश्नाने डोकं वर काढलय. प्रशासन आणखी किती जीव घेणार?