पर्यटक संख्या घटली, कोट्यवधींच्या कर्जांमुळे अनेक तरुण अडचणीत

0
149

 

सिंधुदुर्ग – दिवाळी आणि मे महिन्यातील सुट्टय़ांचा हंगाम मालवणच्या पर्यटनासाठी महत्वाचे मानले जातात. यावर्षी दिवाळी हंगाम वादळांमुळे पाण्यात गेला. नंतर एप्रिल, मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढेल, या आशेवर असलेला व्यावसायिक येथील कोरोनाच्या दणक्याने बेहाल झाला आहे. यावर्षीचा संपूर्ण हंगाम अडचणीचा ठरल्याने कोट्यवधींची कर्जे घेऊन पर्यटन व्यवसायात उतरलेला तरुण, मच्छीमार कुटुंबियांतील युवक मोठय़ा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. पर्यटक हंगामाच्या यावर्षी फक्त 3 लाख 16 हजार पर्यटकांनी एप्रिल 19 ते मार्च 20 या कालावधीत किल्ले सिंधुदुर्गला अधिकृतरित्या नोंद करत भेट दिली आहे.

गतवर्षी सुमारे 4 लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतले होते. गतवर्षी सर्वाधिक पर्यटकांची नोंद झाली होती. गेल्या नऊ वर्षांतील आकडेवारीनुसार 3 लाख 40 हजार 693 ही 2016-17 मधील पर्यटकांची सर्वाधिक संख्या राहिली आहे. आर्थिक वर्ष आणि सप्टेंबर ते मे या पर्यटन हंगामाची सरासरी पाहिली, तर किल्ल्यास भेट दिलेल्या अधिकृत पर्यटकांची संख्या गतवर्षी 3 लाख 90 हजारपेक्षा जास्त नोंदली होती. अधिकचे दिवस मिळाल्यावर ती चार लाखांत पोहोचली होती.

आतापर्यंतच्या पर्यटन इतिहासातील सर्वाधिक गर्दीचा महिना डिसेंबर 2016 ठरला आहे. या महिन्यात तब्बल 79 हजार 186 पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी गर्दी केली. त्या खालोखाल जानेवारी दुसऱ्या क्रमांकाचा तुफानी गर्दीचा महिना ठरला. या महिन्यात 67 हजार 808 पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले. मात्र, डिसेंबर 19 मध्ये तब्बल 67 हजार 121 पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली. जानेवारी 20 मध्ये 61 हजार 612 पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली.

यावर्षी फक्त 3 लाख 16 हजार पर्यटक मालवणात आले. गतवर्षी हा आकडा  साडेचार लाख होता. दीड लाखाने पर्यटक संख्या घटली आहे. यात डिसेंबर आणि एप्रिल-मेचा महत्वाचा हंगाम हातून गेला आहे. यामुळे किल्ला होडी सेवा करणाऱया कुटुंबियांवर, पर्यटक व्यावसायिकांवर मोठे संकट उभे राहिले आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत एकूण 3 लाख 16 हजार 275 पर्यटकांची नोंद झाली आहे. किल्ला प्रवासी वाहतुकीतून शासनाला 29 लाख रुपये  पर्यटकांकडून कर मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here